महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पळून जाणाऱ्या दोघांना पकडले
By शेखर पानसरे | Updated: July 5, 2023 16:07 IST2023-07-05T16:07:21+5:302023-07-05T16:07:43+5:30
या प्रकरणी श्रीरामपूर येथील दोघांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पळून जाणाऱ्या दोघांना पकडले
संगमनेर : मेडिकलमधील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पळून जाणाऱ्या दोघांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले. मंगळवारी (दि.०४) रात्री पावणे नऊच्या सुमारास शहरातील माळीवाडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी श्रीरामपूर येथील दोघांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दर्शन सोमनाथ सोनसळे (वय ३२, रा. वार्ड क्रमांक ३, श्रीरामपूर), लखन विजय माळवे (वय ३२, रा. वार्ड क्रमांक ७, लबडे वस्ती, अशोक टॉकीजच्या मागे, श्रीरामपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सुभाष जर्नादन अभंग (वय ५०, रा. अभंग मळा, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल्सर मोटारसायकलहून १५० सीसी (एम. एच. १६, ए.एल. २६८५) दोघे जण माळीवाडा परिसरात आले. तेथील एका मेडिकलमध्ये ते गेले. तेथील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत त्यांनी ओरबाडून पळून जात असताना त्यांना काही अंतरावर स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडले. चोरट्यांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला होता. चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.