घरासमोरून चारचाकी, दुचाकींची चोरी, मोबाइलही लंपास; चोरीच्या घटनांमध्ये वाढ
By विवेक चांदुरकर | Updated: January 28, 2024 15:07 IST2024-01-28T15:06:05+5:302024-01-28T15:07:25+5:30
मोबाइल चोरीला गेल्याची घटना २८ जानेवारीच घडली.

घरासमोरून चारचाकी, दुचाकींची चोरी, मोबाइलही लंपास; चोरीच्या घटनांमध्ये वाढ
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, जलंब (खामगाव जि. बुलढाणा): जिल्ह्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. माटरगाव येथे घरासमोरून चारचाकी वाहन तर माक्ता येथे घरासमोरून दुचाकी चोरीला गेली. तसेच घाटपुरीतील आठवडी बाजारातून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जणांचे मोबाइल चोरीला गेल्याची घटना २८ जानेवारी रोजी घडली.
राहत्या घरासमोर उभी असलेली चारचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना माटरगाव येथे घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जलंब पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या माटरगाव येथील रहिवासी विनोद वाकोडे यांच्या घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडी क्रमांक (एमएच १९, सीयू ३६७२) ही चोरट्याने चोरून नेली. टेंभुर्णा येथील संतोष उदयभान गवई यांनी जलंब पोलिस ठाण्यात याविषयीची तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ. सचिन बावने करत आहेत.
तसेच माक्ता येथील गोवर्धन ताटे यांनी नवीन घेतलेली दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली. गोवर्धन ताटे यांनी खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच खामगावलगत असलेल्या घाटपुरी येथील आठवडी बाजारातून रविवारी सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान तीन ते चार जणांचे मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली. खामगाव शहरातील अरूण देशमुख यांचा मोबाइल आठवडी बाजारातून चोरट्यांनी लंपास केला. त्यांनी बाजारात शोध घेतला, मात्र त्यांना मोबाइल सापडला नाही.
शेगाव व खामगाव तालुक्यात व शहरात तसेच ग्रामीण भागात चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे सुसाट असले तरी पोलिस मात्र सुस्त झाले आहेत. चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.