नफ्याच्या आमिषाला भुलून तरुणाने तीन लाख गमावले; ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार
By विजय.सैतवाल | Updated: December 17, 2023 22:26 IST2023-12-17T22:25:15+5:302023-12-17T22:26:23+5:30
डिजिटल करन्सीत गुंतवणुकीचे आमिष

नफ्याच्या आमिषाला भुलून तरुणाने तीन लाख गमावले; ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर नफा देण्याचे आमिष दाखवून संकेत जयराज बडगे (२५, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) यांची दोन लाख ९६ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात तीन जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव येथे खासगी नोकरी करणारे संकेत बडगे यांच्या व्हॉटस्अप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यासाठी त्यांनी ३ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या दरम्यान वारंवार संपर्क साधून विश्वास संपादन केला व वेळोवेळी ऑनलाईन रक्कम स्वीकारली. दीड महिना होऊनही नफा मिळाला नाही. नफा तर दूरच राहिला मुद्दल रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे बडगे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.