घिसाडी व्यवसायिकाचे वर्कशॉप फोडून ऐरणीसह ३५ हजारांचे साहित्य लंपास
By काशिनाथ वाघमारे | Updated: July 16, 2023 21:27 IST2023-07-16T21:27:41+5:302023-07-16T21:27:51+5:30
१६ जुलै रोजी मध्यरात्रीला ही घटना घडली

घिसाडी व्यवसायिकाचे वर्कशॉप फोडून ऐरणीसह ३५ हजारांचे साहित्य लंपास
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : शहरातील घिसाडी व्यवसाय काम करुन उपजीविका करणा-याचे वर्कशॉप फोडून चोरट्यांनी ऐरणीसह ३५ हजारांचे साहित्य पळवल्याची घटना बार्शी शहरात घडली. १६ जुलै रोजी मध्यरात्रीला ही घटना घडली. याबाबत घिसाडी व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर शिवाजी पवार (वय ४७, रा. राजन मिल, सोलापूर रोड, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार ज्ञानेश्वर पवार हे १५ जुलै रोजी दुकानात दिवसभर व्यवसाय करून रात्री जेवण आटोपून झोपले. रविवार, १६ जुलै रोजी सकाळी दुकानात येताच चोरट्यांनी वर्कशॉप फोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी लोखंडी ऐरण, मशिनरी स्टोन क्रशर, ह्यामरिंग ड्रील मशीन चोरून नेले आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस नाईक पाटील करत आहेत.