संतोष भिसेसांगली : कवठेमहांकाळमध्ये डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर सातजणांनी बोगस छापेमारी करून तब्बल सव्वा कोटीचा ऐवज लुटला; पण या सातजणांच्या पूर्वनियोजनानुसार कवठेमहांकाळमध्ये डॉ. म्हेत्रे हे टार्गेट नव्हतेच. बेळगावमध्ये जाऊन येथे अशीच बोगस छापेमारी करण्याचा त्यांचा कट होता; पण तेथे एक खून झाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क होती. परिणामी टोळीने कवठेमहांकाळला मोर्चा वळवला आणि त्यांच्या हाती कोट्यवधीचे घबाड लागले.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग या बोगस छाप्याचा माग काढत असताना घटनाक्रमाचे अनेक धागेदोरे उलगडत गेले. गुन्ह्यात एकूण सातजणांची टोळी सामील असली, तरी प्रत्यक्ष छापेमारीसाठी दीक्षा भोसले, महेश शिंदे, अक्षय लोहार व शकील पटेल हे चौघेच डॉक्टरांच्या घरात गेले होते. उर्वरित तिघे शहर व परिसरात अन्यत्र थांबले होते. ऐवज हाती लागल्यानंतर चौघांनी तो ताबडतोब अन्य तिघांकडे सोपविला.
वाचा: डॉक्टरच्या घरावर छापा टाकणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची टोळी कोल्हापूरची, तरुणीसह तिघे जेरबंदत्यानंतर सगळेच वेगवेगळ्या शहरांकडे पळून गेले. यदाकदाचित पोलिस आपल्यापर्यंत पोहोचलेच, तर उर्वरित तिघे आणि ऐवज पोलिसांच्या हाती लागू नये असा त्यांचा प्लॅन होता. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी ठरले. दीक्षाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पार्थ मोहिते व साई मोहिते यांना हातकणंगले येथे ताब्यात घेतले, त्यावेळी त्यांच्याकडील बॅगेत संपूर्ण ऐवज मिळून आला.
पोलिसांच्या अगोदर सीएला माहिती दिली!छापेमारी झाल्यानंतर डाॅक्टरांनी तातडीने पोलिसांना कळवले नाही. पोलिसांना सांगण्यापूर्वी त्यांनी आपल्या सीएशी संपर्क साधला. त्यानंतर अन्य नातेवाइकांना माहिती दिली. सर्वांत शेवटी पोलिसांना कळवले. यात खूपच वेळ निघून गेला. तोपर्यंत संशयित सातहीजण जिल्ह्याच्या हद्दीबाहेर निघून गेले होते. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या घरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर कवठेमहांकाळ पोलिस ठाणे आहे, तरीही त्यांना माहिती मिळण्यात बराच वेळ गेला. अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले की, डॉक्टरांनी सर्वांत प्रथम पोलिसांशी संपर्क साधला असता, तर संशयितांना जिल्ह्याच्या हद्दीतच मुद्देमालासह अटक करण्यात यश आले असते.
महेश इंजिनिअर, त्यानेच ऐवजाची यादी केलीसंशयितांपैकी महेश रघुनाथ शिंदे हा अभियंता आहे. त्यामुळे त्याचे इंग्रजी हस्ताक्षर चांगले आहे. डॉ. म्हेत्रे यांच्या घरात छापेमारीनंतर जप्त केलेल्या ऐवजाची इंग्रजी भाषेतील यादी त्यानेच तयार करून डॉक्टरांना दिली. तो मूळचा जयसिंगपूरचा रहिवासी असला, तरी सध्या मुंबईत घाटकोपरमध्ये राहतो. कवठेमहांकाळमध्ये त्याच्यावर यापूर्वी जुगाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. काही काळ कवठेमहांकाळमध्ये राहिल्याने त्याला डॉ. म्हेत्रे यांच्यासंदर्भात माहिती होती. त्यानेच अन्य साथीदारांना बेळगावऐवजी कवठेमहांकाळचे ठिकाण सुचविले. या कटाचे मूळ नियोजन महेश शिंदे, अक्षय लोहार व शकील पटेल यांचे होते. त्यात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले.
स्पेशल सेव्हनची स्पेशल गाडीबेळगावमध्ये छापेमारीसाठी निघालेल्या या टोळक्याने ऐनवेळी कवठेमहांकाळ निवडले. तेथे जाण्यासाठी सांगलीतील एकाकडून भाडोत्री तत्त्वावर इनोव्हा गाडी घेतली. सांगलीत फिरून खाण्यापिण्याच्या साहित्यासह अन्य काही खरेदीही केली. त्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गाडीच्या चालकाला गुन्ह्याबाबत काहीही माहिती नव्हती. गुन्हा केल्यानंतर संशयितांनी गाडी सांगोला येथे सोडली. तेथून ते बसने मोहोळ येथे गेले. तेथे दागिने व रोकड साई आणि पार्थ यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या गावांना गेले. या सर्व संशयितांना एकत्र आणण्यात महेश शिंदे याचा पुढाकार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दीक्षाने दिली पोलिसांना दिशासंशयितांनी डॉक्टरांच्या घरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर नेल्याने तपासावर मर्यादा येत होत्या; पण पोलिसांनी संशयितांच्या प्रवासमार्गाचा माग काढला. त्यांतील एक संशयित पुण्यातील तरुणी असल्याचे पुढे आले. ती दीक्षा भोसले होती. तिला ताब्यात घेताच तिने इतरांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गतीने हालचाली करत अन्य दोघांना ताब्यात घेतले. अधीक्षक घुगे यांनी सांगितले की, सर्व संशयित पदवीधर आहेत. छापेमारीच्या प्रक्रियेची त्यांना पुरेशी माहिती होती.