उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मामा आणि त्याच्या भाच्याच्या पत्नीने मिळून भाच्याची निर्घृण हत्या केली. त्यांच्या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या भाच्याला त्यांनी कट रचून संपवले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मामा, भाच्याची पत्नी आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक केली असून, त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेला गेलेल्या कपडा आणि बाईक जप्त करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
ही घटना मगराम येथील छतौनी गावात घडली आहे. येथील रहिवासी रामफेर नावाचा तरुण १८ सप्टेंबरच्या संध्याकाळी घरातून बाहेर गेला होता, तो पुन्हा कधीच परत आला नाही. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी, त्याचा मृतदेह घरापासून सुमारे दीड किलोमीटर दूर असलेल्या एका प्लॉटिंग साइटजवळ इंदिरा कालव्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात आढळून आला. त्याच्या गळ्यावर जखमा होत्या. यासोबतच गळा आवळल्याचे निशाण होते. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले.
पत्नी आणि मामा आले संशयाच्या भोवऱ्यात
रामफेरच्या भावाने रविवारी पोलिसांत हत्येची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता अनेक महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले. तपासादरम्यान पोलिसांना रामफेरची पत्नी मीरा हिच्यावर संशय आला. यानंतर, रामफेरचा मामा बसंत लाल याचे नावही समोर आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, तेव्हा या घटनेचा थरारक उलगडा झाला.
दारू पाजून केली हत्या!
आरोपी बसंत लाल याने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, रामफेरच्या घराशेजारी त्याची बहीण राहते. बसंत लाल अनेकदा बहिणीच्या घरी येत-जात असे. याच दरम्यान, त्याचे रामफेरची पत्नी मीरा हिच्याशी संबंध जुळले. दुसरीकडे, रामफेरला दारूचे व्यसन होते आणि तो अनेकदा दारू पिऊन मीराला मारहाण करत असे. याच दरम्यान, रामफेरला मीरा आणि बसंत लाल यांच्या संबंधांविषयी संशय आला आणि तो त्यांच्या नात्याला विरोध करू लागला. या गोष्टीला कंटाळून मीरा आणि बसंत लाल यांनी रामफेरला कायमचा दूर करण्याचा कट रचला.
असा केला प्लॅन
या प्लॅननुसार, बसंत लाल आपल्या एका मित्रासह घटनास्थळी पोहोचला. त्याने रामफेरला तिथे बोलावले आणि त्याला दारू पाजली. रामफेर पूर्णपणे नशेत असताना बसंत लाल आणि त्याच्या मित्राने त्याला पकडले आणि एका कपड्याने त्याचा गळा आवळला. जेव्हा रामफेर बेशुद्ध झाला, तेव्हा त्याला नाल्यात बुडवून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मोबाईल घेऊन ते तिथून फरार झाले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.