जेवण करत बसलेल्या कर्नाटक एसटी बसच्या चालकाला मारहाण करत १५ हजाराचा ऐवज लुटला
By रूपेश हेळवे | Updated: June 17, 2023 15:44 IST2023-06-17T15:41:31+5:302023-06-17T15:44:06+5:30
फिर्यादी फजील हे शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एसटी स्थानकात जेवण करत असलेले असताना रिक्षातून तीन अनोळखी इसम येऊन तुमचे नाव काय असे विचारत त्यांना मारहाण केली.

जेवण करत बसलेल्या कर्नाटक एसटी बसच्या चालकाला मारहाण करत १५ हजाराचा ऐवज लुटला
सोलापूर : गुरूनानक चौकातील दोन नंबर एसटी स्थानकात जेवायला बसलेल्या कर्नाटकातील एसटी कर्मचार्यांना मारहाण करत त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल लुटले. या प्रकरणी फजील अहमद मदारसाब मुल्ला ( वय ४२, रा. गोकाक, बेळगाव) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी फजील हे शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एसटी स्थानकात जेवण करत असलेले असताना रिक्षातून तीन अनोळखी इसम येऊन तुमचे नाव काय असे विचारत त्यांना मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम व चालक उमेश राठोड यांच्या पॅन्टच्या खिशातून तीनशे चाळीस रुपये काढून घेतले. असा एकूण १५ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई माळी करत आहेत.