'नीरी'चे माजी संचालक राकेश कुमार अखेर निलंबित! आर्थिक अनियमिततेचा आराेप, CSIR कडून कारवाई
By निशांत वानखेडे | Published: April 29, 2024 07:49 PM2024-04-29T19:49:10+5:302024-04-29T19:49:47+5:30
'नीरी'चे संचालक असताना माेठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गंभीर आराेप राकेश कुमार यांच्यावर लागले हाेते.
निशांत वानखेडे, नागपूर: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) चे माजी संचालक डाॅ. राकेश कुमार यांना अखेर बरखास्त करण्यात आले आहे. पदाचा दुरुपयाेग करून नातेवाईकांना नीरीमध्ये नाेकरीवर लावणे, बनावट कंपनीला वेतन आणि आर्थिक अनियमिततेच्या आराेपावरून वैज्ञानिक व उद्याेग संशाेधन परिषद (सीएसआयआर) द्वारे अखेर ही कारवाई करण्यात आली.
'नीरी'चे संचालक असताना माेठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गंभीर आराेप राकेश कुमार यांच्यावर लागले हाेते. याबाबतच्या अनेक तक्रारी सीएसआयआरकडे पाेहचत हाेत्या. या तक्रारींची सीएसआयआरकडून चाैकशी करण्यात आली. अनेक महिने ही चाैकशी चालल्यानंतर त्यात गैरप्रकार झाल्याचे दिसून आले. त्यांनी अनेक संशाेधनांचा माेबदला दिला, जे कधी झालेच नाहीत. कागदावर त्या याेजना तयार करण्यात आल्या व संशाेधनाच्या नावावर खानापुर्ती करण्यात आली. संशाेधनाच्या नावाने बनावट संस्थांना माेबदला देण्यात आला. यात काेट्यवधीची हेरफेर झाल्याचा आराेप झाला व आक्षेपही घेण्यात आला हाेता.
दुसऱ्या एका आराेपानुसार नीरीमध्ये अनेक कामांसाठी याेग्यता न पाहता नातेवाईकांना कामे देण्यात आले. डाॅ. कुमार यांनी अनेक पदांची व्हॅकन्सी काढली. त्यानंतर मुलाखतीमध्ये स्वत:चे, दूरचे नातेवाईक व परिचित लाेकांना नाेकरीवर लावले. तक्रारींवर चाैकशी केली असता अनेक आराेप सिद्ध झाल्याने त्यांना सीएसआयआर दिल्ली मुख्यालयी बाेलावण्यात आले. डाॅ. कुमार यांच्याविराेधात नीरीतील कर्मचाऱ्यांनीच नावासकट तक्रारी केल्या हाेत्या. काही दिवसानंतर डाॅ. कुमार निवृत्त हाेणार हाेते पण त्यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कॅटमध्ये दिले आव्हान
या कारवाईच्या विराेधात डाॅ. राकेश कुमार यांनी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल (कॅट) मध्ये आव्हान दिले आहे. कॅटने त्यांच्या अपीलावर सीएसआयआरला उत्तर देण्यासाठी नाेटीस दिली आहे. उत्तर सादर करण्यासाठी ३० एप्रिल २०२४ पर्यंत वेळ देण्यात आला आहे.