पित्यानेच आवळला गतिमंद मुलीचा गळा; आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 07:03 AM2023-09-26T07:03:31+5:302023-09-26T07:03:51+5:30
आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : बापाने १० वर्षीय गतिमंद मुलीचा गळा आवळून तिचा खून केल्याची मन हेलावून टाकणारी घटना पूर्वेकडील मानपाडा, माणगाव परिसरातील हरी म्हात्रे चाळीत रविवारी रात्री घडली. लवली मनोज अग्रहारी, असे मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान, मनोज (३८) या निर्दयी बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत मुलीची आई लीलावती हिने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लीलावती या बाहेर घरकाम करतात. त्यांना चार मुली आहेत. एक मुलगी गावी तिच्या आजीकडे राहते, तर इथे तीन मुली राहतात. पती आरोपी मनोज एका किराणा स्टोअरमध्ये मालाच्या डिलेव्हरीचे काम करतो. त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी लवली ही जन्मापासून गतिमंद असून तिला बोलता आणि ऐकूही येत नव्हते. तिच्यावर उपचार करूनही कोणताही फरक पडत नव्हता. मनोजला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन पत्नी लीलावती आणि चारही मुलींना मारझोड करायचा. लवली हिला मारहाण करताना हिचा तर काहीच उपयोग नाही, हिला एकदाचे कायमचे संपवावे लागेल, असे नेहमी बोलायचा. मागील आठवड्यातही त्याने घरात कोणी नसताना लवलीला मारहाण केली होती. यात तिच्या कमरेला दुखापत झाली होती.
रविवारी सायंकाळी पत्नी लीलावती घरकामासाठी, तर मोठी मुलगी कोमल (१४) ही कामानिमित्त बहीण तनू (४) हिला घेऊन बाहेर गेली होती.
घरात कोणी नसल्याचे पाहून मनोजने लवलीचा गळा आवळून खून केला आणि तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मानपाडा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेत मनोजला अटक केली.
‘लवली मर गई है, जाकर देखो’
आरोपी मनोजची मोठी मुलगी कोमल भंगार दुकानात साफसफाईचे काम करते. लवलीचा खून केल्यावर घराबाहेर पडलेला मनोज तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. ‘लवली मर गई है, जाकर देखो’, असे तिला सांगून तो पसार झाला. कोमलने लागलीच घर गाठले असता लवली निपचित पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने याची माहिती आई लीलावतीला दिली. त्यांनत लीलावतीने तातडीने याची माहिती पोलिसांना कळविली.