फरशीवर आपटून बापानेच केला अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा खून, दारूच्या नशेत केले कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 23:19 IST2022-09-21T23:19:01+5:302022-09-21T23:19:18+5:30
वांगी : शिवाजीनगर (ता. कडेगांव) येथे साेमवारी रात्री मद्यपी बापाने दारूच्या नशेत अडीच वर्षांच्या चिमुकल्यास फरशीवर आपटले. उपचारादरम्यान मंगळवारी ...

फरशीवर आपटून बापानेच केला अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा खून, दारूच्या नशेत केले कृत्य
वांगी : शिवाजीनगर (ता. कडेगांव) येथे साेमवारी रात्री मद्यपी बापाने दारूच्या नशेत अडीच वर्षांच्या चिमुकल्यास फरशीवर आपटले. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा या बालकाचा मिरज शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. पती-पत्नीच्या भांडणातून हा धक्कादायक प्रकार घडला. आयुष अर्जुन सावंत असे मृत बालकाचे नाव आहे. संशयित अर्जुन अनिल सावंत (रा. अंत्री बुद्रुक, ता. शिराळा, सध्या रा. शिवाजीनगर, ता. कडेगाव) याला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित अर्जुन सावंत याला दारूचे व्यसन आहे. तो वारंवार पत्नी पिंकी हिच्याशी चारित्र्याचा संशय घेऊन भांडण करीत असे. सोमवार, दि. १९ रोजी सायंकाळी पिंकी या कामावरून घरी आल्यानंतर अर्जुन पुन्हा तिच्याशी भांडायला लागला. यावेळी पिंकीजवळ बसलेल्या आयुषला हिसकावून घेऊन फरशीवर आपटून रक्तबंबाळ केले. सर्वांनी आयुषला त्याच्या तावडीतून साेडवून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री १२ वाजता त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेनंतर अर्जुनने शिवाजीनगरमधून पाेबारा केला हाेता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कडेगाव पाेलिसांनी तपासाला गती देत आज, बुधवारी सकाळी अंत्री बुद्रुक येथून त्याला अटक केली.