कानबाईच्या विसर्जनाला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यूच; आईचा आधार हरपला
By सुनील पाटील | Updated: August 8, 2022 14:59 IST2022-08-08T14:59:04+5:302022-08-08T14:59:14+5:30
लोकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून नानाला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.

कानबाईच्या विसर्जनाला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यूच; आईचा आधार हरपला
जळगाव : कानबाईच्या विसर्जनासाठी मेहरुण तलावात गेलेल्या नाना सुरेश सोनवणे (वय ३२,रा.इच्छा देवी चौक) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १ वाजता घडली. एकुलत्या व कमावत्या मुलाचा मृत्यू झाल्याने आईने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना सोनवणे हा इच्छा देवी चौकात वाहनांमध्ये प्रवाशी बसविण्याचे काम करायचा. सोमवारी कानबाईचे विसर्जन असल्याने तो त्यासाठी गेला होता. विसर्जन करीत असताना पायऱ्यांजवळ कपारीत पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सोबतच्या नागरिक व महिलांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेतली.
लोकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून नानाला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नातेवाईक व मित्र मंडळीची मोठी गर्दी जमली होती. आई व कुटूंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. नाना याचे वडील व भाऊ यांचे निधन झाले आहे. दोन बहिणी असून त्यांचा विवाह झालेला आहे. आईचा तोच आधार होता. मिळेल ते काम करुन त्यातून मिळणाऱ्या पैशातून आई व त्याचा उदरनिर्वाह भागत होता. आता आईचाच आधार गेल्याने तिला मोठा धक्का बसला. नाना हा अत्यंत गरीब व मनमिळावू मुलगा होता. तो अविवाहित होता. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.