ठाणे: ठाण्यात एक विचित्र घटना घडली आहे. दारूच्या नशेतच झालेल्या वादावादीतून आपल्याच ३७ वर्षीय मित्राच्या कानाचा चावा घेतल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. विकास मेनन याने आपल्या मित्राच्या कानाचा चावा घेतला. याप्रकरणी विकास मेनन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
घोडबंदर रोडवरील पातलीपाडा भागातील हिरानंदानी इस्टेटमधील एका इमारतीमध्ये श्रवण लिखा हा मित्र वास्तव्याला आहे. याच मित्राच्या घरी विकास मेनन त्याच्यासोबत मद्य प्राशन करण्यासाठी बसला होता. एका विषयावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला. याच वादातून विकास मेननने आपल्या मित्र श्रवण लिखाच्या कानाचा चावा घेऊन त्याला रक्तबंबाळ केले.
सध्या श्रवण लिखा याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच, श्रवण लिखा याच्या तक्रारीवर कासारवडवली पोलिस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.