दहशतवादी मजकूर प्रकरण : नेपाळ कनेक्शन आणि संशयित मोबाईल तपासावर पोलीसांची नजर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:45 PM2019-06-13T20:45:08+5:302019-06-13T20:46:34+5:30

संशयित आरोपीला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी 

Terror Text Case: Police Looking on Nepal Connection and Suspected Mobile investigation | दहशतवादी मजकूर प्रकरण : नेपाळ कनेक्शन आणि संशयित मोबाईल तपासावर पोलीसांची नजर 

दहशतवादी मजकूर प्रकरण : नेपाळ कनेक्शन आणि संशयित मोबाईल तपासावर पोलीसांची नजर 

googlenewsNext
ठळक मुद्देअमीरउल्ला समीउल्ला शेख (३३) याला न्यायालयाने पुन्हा १७ जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.मनोरुग्ण असल्याचे आरोपीकडून सांगितले जात असले तरी त्याचीही पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे.

मधुकर ठाकूर

उरण - उरण येथील खोपटा पुलाच्याखाली असलेल्या खांबावर सांकेतिक कोडमध्ये दहशतवादी पद्धतीने मजकूर लिहून परिसर आणि पोलीस, सुरक्षा यंत्रणेलाच हादरून सोडणाऱ्या संशयित अमीरउल्ला समीउल्ला शेख (३३) याला न्यायालयाने पुन्हा १७ जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हस्तगत  करण्यात आलेल्या मोबाईलची तपासणी, मनोरुग्ण असल्याची खातरजमा करून घेण्यासाठी, नेपाळ कनेक्शन तपासणी आणि इतर संशयित बाबतीत बारकाईने तपासून पाहण्यासाठी न्यायालयाने आणखी पाच दिवसांचा रिमांड मंजूर केला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

सोमवारी (ता. ४)  उरण येथील खोपटा पुलाच्याखाली असलेल्या खांबावर सांकेतिक कोडमध्ये दहशतवादी पध्दतीने मजकूर लिहल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिक पातळीवरीलच नव्हे देशपातळीवरील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेची झोप पार उडाली आहे.या प्रकारात खोडसाळपणा केलेला आढळून आल्याची शक्यता दूर सारत पोलिसांनी सुरुवातीपासूनच गांंभिर्याने तपास कामाला सुरुवात केली होती. सलग तीन दिवसांच्या तपासानंतर पुलाच्या खांबावर दहशतवादी मजकूर लिहणाऱ्या संशयिताला मजकूर लिहताना पाहिल्याचा पहिला साक्षीदार पोलिसांनी शोधून काढला. त्यानंतर दहशतवादी मजकूर लिहणारा संशयित अमीरउल्ला समीउल्ला शेख येथे मागील दहा वर्षांपासून धसाखोसी खोपटे येथेच कामानिमित्ताने वास्तव्य करून असल्याची बित्तंबातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनीही अधिक वेळ न दडवता सावजावर शिताफीने झडप घातली आणि गुरुवारी अटक होती.न्यायालयाने त्याला 12 जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
 यानंतरच्या तपासणीत पोलिसांनी दुरुस्तीसाठी देण्यात आलेला मोबाईल आरोपीकडून हस्तगत करण्यातही पोलिसांना यश आले आहे. मात्र तपास कामात संशयित आरोपी अमीरउल्ला समीउल्ला शेख सहकार्य करीत नाही. त्याशिवाय तो मनोरुग्ण असल्याचेही सांगू लागला आहे. आरोपींची सासरवाडी नेपाळमध्ये आहे. दोन मुलांची आई असलेली आरोपीची पत्नी मुलांसह उरणमध्ये दाखल झाली आहे.पोलिसांसाठी तपासकामी मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपीची सासरवाडी नेपाळमध्ये आहे. त्यामुळे आरोपीचे नेपाळ कनेक्शनही तपासून पाहिले जाणार आहे. मनोरुग्ण असल्याचे आरोपीकडून सांगितले जात असले तरी त्याचीही पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे. आरोपीची देशभरातील वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडूनही कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहितीही उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: Terror Text Case: Police Looking on Nepal Connection and Suspected Mobile investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.