तेलंगणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यात बीएमडब्ल्यू कार न मिळाल्याने रागावलेल्या २१ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण त्याच्या पालकांकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याचा हट्ट करत होता. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, ते शेतात काम करून आपलं घर चालवतात. त्यांनी मुलाला बीएमडब्ल्यू कारऐवजी स्विफ्ट डिझायर कार खरेदी करण्यास सांगितलं होतं. यामुळे नाराज झालेल्या तरुणाने आत्महत्या केली.
सिद्दीपेट जिल्ह्यातील चटलापल्ली येथे ही भयंकर घटना घडली. बोम्मा जॉनी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, तरुणाने दहावीनंतर शिक्षण सोडलं होतं. त्याला दारूचं व्यसन होतं. त्याला चांगली लाईफस्टाईल हवी होती आणि तो त्याच्या पालकांकडे तशीच मागणी करत होता.
तरुणाच्या कुटुंबाकडे २ एकर जमीन आहे. तो शेतात काम करू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. याच काळात त्याला दारूचं व्यसन लागलं. रिपोर्टनुसार, तरुणाचं एक आलिशान घर आणि बीएमडब्ल्यू खरेदी करण्याचं स्वप्न होतं. या कारणास्तव तो सतत त्याच्या कुटुंबावर दबाव आणत होता.
जॉनी कुटुंबावर सतत दबाव आणत होता. याच दरम्यान, त्याने आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती. कुटुंबातील सदस्यांनी आर्थिक परिस्थितीचे कारण देत स्वस्त कार खरेदी करण्यास सांगितलं. त्यांनी मुलाला स्विफ्ट डिझायर कार घेतो असं सांगितलं. तरुणाचे वडील एका कार शोरूममध्ये गेले. जिथे त्यांनी मुलाला स्विफ्ट डिझायर घेण्यास सांगितलं.
नाराज झालेल्या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांनी त्याला स्थानिक सरकारी रुग्णालयात नेलं. तेथे त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.