तेलंगणामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या १५ महिन्यांच्या मुलाला नलगोंडा आरटीसी बस स्टँडवरील बाकावर सोडून बॉयफ्रेंडसोबत पळ काढला. मुलगा एकटा बसून रडत होता. जेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या आणि डेपोमधील कर्मचाऱ्यांनी रडणाऱ्या मुलाला पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हे संपूर्ण दृश्य तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षांची महिला हैदराबादची आहे. काही महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर नलगोंडाच्या एका तरुणाशी मैत्री झाली. हळूहळू दोघांची जवळीक वाढू लागली आणि लवकरच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. ती महिला तिच्या १५ महिन्यांच्या मुलासह त्या तरुणाला भेटण्यासाठी नलगोंडा पोहोचली होती. तिथे तो तरुण तिला घेण्यासाठी बाईकवरून बस स्टँडवर पोहोचला.
बॉयफ्रेंडने तिला सोबत येण्यास सांगितलं तेव्हा महिलेने आपल्या मुलाला बस स्टँडच्या बाकावर बसवलं आणि मागे वळून न पाहता त्या तरुणाच्या बाईकवरून निघून गेली. यानंतर मुलगा त्याच्या आईला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावत राहिला आणि नंतर बाकावर बसून रडू लागला. त्याला रडताना पाहून बस स्टँडवर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी आणि डेपो कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बस स्टँडच्या सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा त्या मुलासोबत एक महिला स्पष्टपणे दिसली. दुसऱ्या फुटेजमध्ये ती एका तरुणाच्या बाईकच्या मागे बसून जाताना दिसली. पोलिसांनी बाईक नंबरच्या मदतीने त्या तरुणाचा शोध सुरू आहे. तपासानंतर पोलिसांसमोर धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसांनी त्या महिलेला, तिच्या पतीला आणि बॉयफ्रेंडला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि त्यांचं समुपदेशन केलं. याच दरम्यान, महिलेने कबूल केलं की तिला तो तरुण आवडतो आणि ती त्याच्यासोबत जाऊ इच्छित होती. यानंतर, पोलिसांनी मुलाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आणि त्याला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.