अमेठी - उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी लग्न समारंभात तंदूरी रोटीवरून २ युवकांमध्ये वाद झाला. या वादाचं हाणामारीत रुपांतर झाले आणि त्यातच दोघांचा जीव गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अमेठीतील बलभद्रपूर गावात ही घटना घडली जिथं एका किरकोळ कारणावरून हिंसक वाद निर्माण झाला त्यामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदात विरजन पडले.
शनिवारी संध्याकाळी बलभद्रपूर येथे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचं लग्न होते. वऱ्हाड आले, लग्नाच्या सर्व विधी सुरू होत्या. परंतु जेवणावेळी जे घडले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तंदूरी रोटी घेण्यावरून २ युवक भिडले. १८ वर्षीय रवी कुमार आणि १७ वर्षीय आशिष कुमार या दोघांमध्ये रोटी आधी कोण घेणार त्यावर वाद झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी काठीने मारायला उठले. या हाणामारीत आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर मारहाणीत जखमी झालेला रवी कुमार याला लखनौच्या ट्रॉमा सेंटरला उपचारासाठी नेले परंतु वाटेतच त्याने जीव सोडला. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली तेव्हा घरात शोककळा पसरली. ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले.
दरम्यान, लग्नाच्या एका सोहळ्यात २ युवकांमध्ये मारहाण झाली. ज्यात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेत ते पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. तक्रार आणि पोस्टमोर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास सुरू केला जाईल. या प्रकरणी जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं गौरीगंज सर्किलचे सीओ अखिलेश वर्मा यांनी म्हटलं आहे.