संशयातून भाच्याने केली मामीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:25 IST2020-07-30T00:11:06+5:302020-07-30T00:25:23+5:30
आपटीबारी येथील घटना : आरोपी अटकेत, जादूटोणा केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा संशय

संशयातून भाच्याने केली मामीची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण/म्हारळ / टिटवाळा : ‘अंगात भूत असून, ते तंत्रमंत्र करून बाहेर निघेल,’ या अंधश्रद्धेपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या मारहाणीत पंढरीनाथ शिवराम तरे आणि चंदूबाई शिवराम तरे या मायलेकाची घरातल्या व्यक्तींकडून हत्या झाल्याची कल्याणमधील घटना ताजी असतानाच मामीने जादूटोण्याने पत्नीचा मृत्यू झाला या संशयातून भाच्याने मामीची सुरा भोसकून हत्या केल्याची घटना कल्याण तालुक्यातील वाहोली आपटीबारी येथे मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहन चंदर वाघे असे अटक आरोपीचे नाव आहे.
मोहनच्या पत्नीचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिचा मृत्यू मामी गुलाबबाई मारवत वाघे हिने जादूटोणा केल्याने झाल्याचा संशय मोहनच्या मनात होता. या संशयातून गुलाबबाई मंगळवारी सांयकाळी अंगणात बसली असताना तिच्याशी मोहनने भांडण केले. मोहनने घरातून सुरा आणून गुलाबबाई हिच्या पोटात भोसकला. यात गुलाबबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी गुलाबबाई हिचा मुलगा गणपत याने टिटवाळा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मोहनला मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अटक करण्यात आली. त्याने हत्या करताना वापरलेला सुराही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
पुरोगामी राज्याला
फासला काळिमा
संशयातून तसेच अंधश्रद्धेतून एकत्रित कुटुंब पद्धतीत दुहेरी हत्याकांड नुकतेच घडले. अंधश्रद्धेतून घडलेल्या या खळबळजनक हत्याकांडावरुन सर्वत्र टीका होत असतानाच, आता कल्याण तालुक्यातील वाहोली आपटीबार येथे जवळच्या नातेवाइकाकडून संशयातून झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी विचारांच्या राज्याला अशा घटनांमुळे काळिमा फासला जात असल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहेत.