‘त्या’ औषधांनी सुशांतची तब्येत बिघडली, मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 06:26 IST2020-11-04T02:57:23+5:302020-11-04T06:26:05+5:30
Sushant Singh Rajput death case : सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सीबीआयने सुशांतची मैत्रीण रियावर नोंदविला.

‘त्या’ औषधांनी सुशांतची तब्येत बिघडली, मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
मुंबई : दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्याच्या दोन बहिणी प्रियांका आणि मीतू यांच्याविरुद्ध
रिया चक्रवर्तीने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविणे आमचे कर्तव्य आहे, असे मुंबई पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले.
सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सीबीआयने सुशांतची मैत्रीण रियावर नोंदविला. ७ सप्टेंबरला रियाने सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मीतूविरुद्ध मुंबई पोलिसांत गुन्हा नोंदविला. तिच्या तक्रारीनुसार, या दोघींनी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी असलेली औषधांचे प्रिस्क्रिप्शन सुशांतसाठी दिले. त्यानंतर दाेघींनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सीबीआयने मात्र सुशांतच्या बहिणींवरील आरोपांत तथ्य नसून रियाचे आराेप काल्पनिक असल्याचे सांगितले. तर, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बहिणींनी दाखल केलेल्या याचिकेला विरोध करत बहिणींनी केलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांची किंवा मृत व्यक्तीची प्रतिष्ठा आपण धुळीस मिळवत नसून सीबीआयच्या तपासास अडथळा निर्माण करत नाही, असे मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
कंगना, रंगोली हजर व्हा!
अभिनेत्री कंगना रनाैत व तिची बहीण रंगोली यांना मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या दोघींविरोधात
वांद्रे पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे ट्विट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार त्यांना चाैकशीसाठी दिवाळीच्या दोन दिवस आधी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दोघींना नव्याने नोटीस पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.