इंदूर - मध्य प्रदेशात राजकीय वातावरण तापलेले असून सत्ताधारी काँग्रेसच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या ३५३ कार्यकर्त्यांसह पोलिसांनी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही ताब्यात घेतलं आणि सोडून देण्यात आलं असल्याची माहिती जिल्ह्या तुरुंग अधीक्षक अदिती चतुर्वेदी यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या भाजप नेत्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांसह खासदारांचाही समावेश आहे. मध्य प्रदेश भाजपा अध्यक्ष राकेश सिंग यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात CAA च्या (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) समर्थनार्थ काढलेल्या रॅलीनंतर ही कारवाई करण्यात आली. भाजपने कलम १४४ चे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन जिल्हा कारागृहात नेलं आणि नंतर सोडून दिले. यात भाजपचे मध्य प्रदेश अध्यक्ष राकेश सिंग, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, इंदूरचे खासदार शंकर ललवानी, आमदार आणि इंदूरच्या महापौर मालिनी सिंग यांचाही समावेश होता.