The student's earrings were stolen from entering a school, the incident at a designated school | शाळेत घुसून विद्यार्थिनीचे कानातले चोरले, नामांकित शाळेतील घटना

शाळेत घुसून विद्यार्थिनीचे कानातले चोरले, नामांकित शाळेतील घटना

मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळेत पालकसभा असल्याची संधी साधून सुरक्षारक्षकांची नजर चुकवत लुटारू महिलेने शाळेच्या आवारात प्रवेश मिळवला. त्यानंतर मात्र तिने शिक्षक असल्याचे भासवून शाळेत वावरत, शाळेतील शौचालयात एकट्या जात असलेल्या दुसरीतील एका विद्यार्थिनीला हेरले. शाळेत सोन्याचे कानातले घालून आलेले पाहिल्यास शिक्षक ओरडतील, अशी भीती घालून, या मुलीचे कानातले लंपास करत पळ काढला. जोगेश्वरीतील एका नामांकित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून, शाळेतील सीसीटीव्हीमध्ये ती महिला कैद झाली आहे. शाळेमध्ये घुसून लुटीच्या या घडलेल्या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


जोगेश्वरी पूर्वेकडील रामवाडीत ३७ वर्षीय तक्रारदार या कुटुंबीयांसोबत राहतात. ८ वर्षांची मुलगी नेहा (नावात बदल) जवळ्च्याच खासगी शाळेत दुसरी इयत्तेत शिक्षण घेत आहे. २० आॅगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान शाळेत पालकसभा असल्याने पालक येण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान लुटारू महिलेनेही सुरक्षारक्षकाची नजर चुकवून शाळेत प्रवेश केला. नेहा शौचालयात असताना महिलेने तिला थांबवले. सोन्याचे कानातले घालण्यास शाळेत बंदी आहे. टीचरने पाहिल्यास तुला ओरडतील, असे बोलून तिचे कानातले काढून घेतले. आणि कानातले बॅगेत ठेवल्याचे भासवून मुलीला बोट धरून शौचालयाबाहेर आणले. महिला निघून गेली. घरी आल्यानंतर आईने कानातल्यांबाबत मुलीकडे विचारणा केली असता, तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. हे ऐकून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेत धाव घेत, याबाबत विचारणा केली. तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये संशयित महिला कैद झाली. सीसीटीव्हीमधील संशयित महिलेनेच कानातले काढल्याचे मुलीने सांगताच तिच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.


सीसीटीव्हीनुसार, पंजाबी सलवार कुर्तीमध्ये महिलेने साडेबाराच्या सुमारास शाळेत प्रवेश केला. पुढे एका विद्यार्थिनीला थांबवून तिच्याकडून नोटबुक घेतली. स्वत: शिक्षक असल्याचे भासवून ती फिरताना दिसते. पुढे राष्ट्रगीत सुरू असताना ती थांबते. त्यानंतर ती शौचालयात गेली आणि शौचालयातून बाहेर येताना ती नेहासोबत दिसते. १५ मिनिटांतच शाळेतून ती निघून जाताना दिसत आहे. नेहासह ज्या मुलीकडून तिने नोटबुक घेतली. त्या मुलीकडे पोलिसांनी विचारणा केली, तेव्हा ती मुलगीदेखील त्या महिलेला ओळखत नसल्याचे समोर आले. महिलेने शिक्षक असल्याचे भासवून तिच्याकडून नोटबुक घेतल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. तिच्या उच्च राहणीमानामुळे तिच्यावर संशय आला नाही आणि पालक सभेमुळे सुरक्षारक्षकानेही चौकशी केली नाही.

सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू
पंजाबी सलवार कुर्तीमध्ये महिलेने साडेबाराच्या सुमारास शाळेत प्रवेश केला. पुढे एका विद्यार्थिनीला थांबवून तिच्याकडून नोटबुक घेतली. स्वत: शिक्षक असल्याचे भासवून ती फिरताना दिसते. पुढे, राष्ट्रगीत सुरू असताना ती थांबते. त्यानंतर ती शौचालयात गेली आणि शौचालयातून बाहेर येताना ती नेहासोबत दिसते. १५ मिनिटांतच शाळेतून ती निघून जाताना दिसत आहे.

Web Title: The student's earrings were stolen from entering a school, the incident at a designated school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.