Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयातील शिलाँग येथे हनिमूनदरम्यान पती राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या सोनम रघवुंशीबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. हनिमूनच्या बहाण्याने राजा रघुवंशीला मेघालय येथे नेऊन सोनमने प्रियकरासह मिळून त्याची हत्या केली होती. त्यानंतर सोनम बेपत्ता झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर आत्मसमर्पण केले. मेघालय पोलिसांनी याप्रकरणात सोनमसह चार अटक केली आहे. मेघालय पोलिसांना या प्रकरणाच्या तपासादम्यान सोनमच्या मंगळसुत्रामुळे महत्त्वाचा पुरावा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
सोनम आणि राजा यांचा विवाह ११ मे रोजी इंदूरमध्ये झाला होता. २० मे रोजी हनिमूनसाठी ते गुवाहाटीमार्गे मेघालयात गेले होते. त्यानंतर सोनम आणि राजा अचानक बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह वेसॉडोंग धबधब्याजवळील खोल दरीत आढळला. त्यानंतर सोनमचा शोध सुरू झाला.९ जून रोजी सोनम गाझीपूरच्या एका ढाब्यावर सापडली. त्यानंतर मेघालय पोलिसांनी सोनमनेच राजाला संपवण्यासाठी सुपारी दिल्याचे सांगितले. याप्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा याच्यासह आणखी तिघांना अटक करण्यात आली. सोनमने सोहरा येथील एका होमस्टेमध्ये तिची सुटकेस सोडली होती आणि त्यात तिचे मंगळसूत्र आणि अंगठी होती. या हत्याकांडाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मेघालयचे पोलिस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले की, राजा रघुवंशी आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वी, या जोडप्याने सोहरा येथील एका होमस्टेमध्ये त्यांची सुटकेस सोडली होती. सुटकेसमध्ये सापडलेल्या मंगळसूत्र आणि अंगठीमुळे या प्रकरणाचा तपास करण्यात मदत झाली. हे दागिने मागे सोडून गेलेल्या सोनमवर आम्हाला संशय आला होता. त्यामुळे आम्ही तिच्या बाजूने तपास करु लागले. राजा आणि सोनम हे २२ मे रोजी सोहरा येथे ज्या 'होमस्टे'मध्ये गेले होते तिथे खोली मिळाली नाही कारण त्यांनी बुकिंग केले नव्हते. डबल-डेकर रूट ब्रिज पाहण्यासाठी नोंग्रिअट गावात जाण्यासाठी ३,००० पायऱ्या चढायला लागणार असल्याने त्यांनी सुटकेस होमस्टेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.
सोनम आणि राजाची सुटकेस सोहरा येथील होमस्टेमध्येच होती. मात्र त्यांनी रात्र नोंगरियाट येथील होमस्टेमध्ये घालवली आणि २३ मे रोजी निघून गेले. त्यानंतर ते सोहराला परत आले. पार्किंगमधून त्यांची स्कूटर घेतली आणि वेसाडोंग धबधब्यावर गेले. तिथेच राजाला त्याच्या पत्नीसमोर तिघांनी संपवले. पोलिसांनी सांगितले की, सोनमने राजाचा मृतदेह दरीत फेकण्यासाठी आम्हाला मदत केली होती, अशी कबुली हल्लेखोरांनी दिली.