लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटाला आपली सासूच जबाबदार असल्याच्या रागातून एका जावयाने आपल्या सासूला टेम्पोत जाळल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली. या आगीत आरोपीचाही मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार वाटला होता. मात्र चौकशीनंतर जावयानेच सासूची हत्या करून स्वतःला जाळून घेतल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील आरोपीचे नाव कृष्णा दाजी अष्टणकर (वय ५६) असे आहे, तर त्याच्या मृत सासूचे नाव बाबी दाजी उसरे (७२) होते. सासू आणि जावयामध्ये बऱ्याच काळापासून भांडण होते. बाबी उसरे या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा येथे आपली घटस्फोटित मुलगी आणि २२ वर्षांच्या नातवासह राहत होत्या. टेम्पो ड्रायव्हर असलेला कृष्णा त्याची पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहत होता.
खुनाचा गुन्हा दाखलटेम्पोतून धूर येत असल्याचे दिसताच लोकांनी पोलिसांना कळवले. अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर पोलिसांनी शटर उघडले असता आत दोघांचेही जळालेले मृतदेह सापडले. टेम्पोमध्ये पोलिसांना हातोडा, थिनरची बाटली आणि लाइटर सापडले. दोन्ही मृतदेह वीर सावरकर रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आले. नवघर पोलिसांनी मृत कृष्णा विरुद्ध खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदवला.
काय घडले?कृष्णा त्याच्या टेम्पोतच राहत होता. सोमवारी सकाळी तो उसरेंच्या घरी गेला आणि बाबी यांना रुग्णालयात घेऊन जातो, असे सांगितले. तो अनेकदा त्यांच्या घरी जात असे. त्यामुळे बाबी विश्वासाने त्याच्यासोबत टेम्पोत बसल्या. त्याने काही अंतरावर टेम्पो पार्क केला आणि त्याचे शटर ओढून घेत आतून कुलूप लावले. यानंतर त्याने बाबी यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केले. त्यानंतर त्याने बाबी यांना पेट्रोल आणि थिनर टाकून पेटवले. आगीत तोही होरपळला.