नाती ही विश्वासावर टिकलेली असतात, मात्र जेव्हा रक्ताचेच नाते रक्ताच्या नात्याला ओरबाडते, तेव्हा माणुसकीवरचा विश्वास उडतो. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक अशीच संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका नराधम मुलाने आपल्याच अल्पवयीन चुलत बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हे पाप उघड झाले. मात्र, या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे, आरोपीच्या आईने नात्याचा मोह बाजूला सारून आपल्या नराधम मुलाला पोलिसांच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला आहे.
लहानपणापासून पोटच्या पोरीसारखं सांभाळलं..
भिटौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पीडित मुलगी अनाथ होती. आईचे छत्र हरवलेले आणि वडिलांच्या व्यसनाधिनतेमुळे तिचे बालपण अंधारात होते. अशा वेळी तिच्या आतेने तिला स्वतःच्या घरी आणले. पोटच्या मुलाप्रमाणे तिचा सांभाळ केला. मात्र, ज्या भावाच्या खांद्यावर रक्षणाची जबाबदारी होती, त्याच नराधम भावाने बहिणीच्या अगतिकतेचा फायदा घेतला.
अशी उघड झाली घटना
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले. जेव्हा तिला गरोदर असल्याची जाणीव झाली, तेव्हा तिने रडत रडत आपल्या आतेला सर्व हकीगत सांगितली. आरोपीने लग्नाचे किंवा इतर भूलथापा देऊन तिला शारीरिक संबंधांसाठी प्रवृत्त केले होते. हे ऐकताच आतेच्या पायाखालची जमीनच सरकली.
आईचा धाडसी निर्णय; नराधम मुलगा फरार
आपल्या पोटच्या मुलाने इतके घृणास्पद कृत्य केले आहे हे समजल्यावर त्या महिलेने क्षणाचाही विचार न करता पोलीस ठाणे गाठले. "माझा मुलगा असला तरी तो गुन्हेगार आहे, माझ्या भाचीला न्याय मिळालाच पाहिजे," अशी भूमिका घेत तिने मुलाच्या विरोधात एफआयआर दाखल केला. सध्या आरोपी मुलगा गावातून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भिटौली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या तक्रारीवरून आणि तिच्या आतेच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील," असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.