ठाणे/मुंब्रा : मुंब्रा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि युट्यूबर नदीम खान उर्फ बाबा खान यांच्या घरासह वाहनावर शनिवारी पहाटे ४.५० वाजता एका टोळीने गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपीचा थरारक पाठलाग करणाऱ्या पोलिस पथकावरही हल्लेखोराने दोन रिव्हॉल्व्हरमधून बेछूट गोळीबार केला. मात्र, जीवाची पर्वा न करता मुंब्रा पोलिसांनी सराईत गुन्हेगार शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (वय २८) याला अटक केली. या धुमश्चक्रीत दोन स्थानिक नागरिकांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंब्रा भागात पोलिसांची जादा कुमक तैनात केली आहे.
कौसा येथील अरमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणारे नदीम यांच्या घराबाहेर शनिवारी पहाटे गोळीबाराचा आवाज झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर दोन आणि हवेत एक अशा तीन गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच बीट मार्शल आणि मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तेजस सावंत, अनिल सोनवणे यांच्यासह पथक अवघ्या पाच ते सात मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.
दोन हल्लेखोर जखमी
हल्लेखोर आचार गल्लीतील भंगार गोदामात लपला. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले असता, त्याने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. सहायक पाेलिस निरीक्षक सावंत यांनीही रिव्हाॅल्व्हर राेखत गाेळीबार करण्यास प्रतिकार केला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर हल्लेखोराने जमावाच्या दिशेनेही गोळीबार केला. यामध्ये फारुक अहमद शेख याच्या पाेटाजवळ तर रहीम सय्यद याच्या डाव्या हाताच्या बाेटावर गाेळी लागून जखमी झाले.
कारण अद्याप अस्पष्ट
सध्या शहाबादच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
८ वर्षांचा ‘तिहार’चा प्रवास
सहायक पोलिस निरीक्षक सावंत, पोलिस हवालदार अजीज तडवी, अंकुश शिंदे आणि अंमलदार अजिंक्य महाडिक, प्रशांत घुले आणि साेपान काकड यांनी जमाव असल्यामुळे गाेळीबार करण्याऐवजी स्वत:चा जीव धोक्यात घालून हल्लेखोराला जमिनीवर पाडले आणि त्याच्याकडील दोन पिस्तूल, चार मॅगझिनसह जिवंत काडतुसे जप्त केली. हल्लेखोर सराईत गुन्हेगार शहाबाद असल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्याने दिल्लीतील तिहार कारागृहात आठ वर्षे शिक्षा भोगली. त्याच्यावर दिल्लीतील जाफ्राबाद पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Web Summary : Mumbra builder Nadeem Khan's house and car were fired upon. Police arrested criminal Shahabad after an exchange of fire where two locals were injured. The motive is unclear.
Web Summary : मुंब्रा में बिल्डर नदीम खान के घर और कार पर गोलीबारी हुई। पुलिस ने मुठभेड़ के बाद अपराधी शहाबाद को गिरफ्तार किया जिसमें दो स्थानीय लोग घायल हो गए। मकसद अभी स्पष्ट नहीं है।