मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेने पोटच्या दोन वर्षांच्या मुलाला कालव्यात फेकून दिल्याची संतापजनक घटना समोर आली. मांत्रिकाने संबंधित महिलेला तुझा मुलगा जिन्न असल्याचे पटवून दिले. त्याला भुलून महिलेने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून पोलीस, अग्निशमन दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक लोक मुलाचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मेघा लुक्रा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिचे कपिल लुक्रा नावाच्या व्यक्तीसोबत १६ वर्षांपूर्वी लग्न झाले. ते फरीदाबादच्या सैनिक कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहतात. त्यांची मोठी मुलगी १४ वर्षांची आहे. तर, त्यांचा धाकटा मुलगा दोन वर्षांचा होता. म्हणजेच मोठ्या मुलीच्या जन्मानंतर तब्बल १२ वर्षांनी लुक्रा यांना मुलगा झाला. दरम्यान, रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मेघा कोणालाही न सांगता धाकट्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली. त्यानंतर मेघाने आपल्या मुलाला बीपीटीपी पुलावरुन खाली कालव्यात फेकले, जे स्थानिक लोकांनी पाहिले.
कपिल लुक्रा यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मेघा गेल्या काही दिवसांपासून एका मांत्रिकाच्या संपर्कात होती. मांत्रिकाने मेघाला तिचा मुलगा पांढरा जिन्न असल्याचे सांगितले आणि तो झ्या संपूर्ण कुटुंबाला नष्ट करेल, असे सांगितले. यामुळे मेघा गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.