पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर ओळख पटू नये, म्हणून मृतदेह ॲसिडने जाळण्याचा प्रयत्नही केला. युसूफ खान (वय २९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना छर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनसारी गावात घडली आहे. युसूफ खान २९ जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता, पण तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली. रात्रभर शोधूनही त्याचा काहीच ठावठिकाणा न लागल्यामुळे, युसूफचे वडील भूरे खान यांनी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पाच दिवसांनी सापडला मृतदेह!
युसूफ बेपत्ता झाल्यानंतर पाच दिवसांनी, कासगंज जिल्ह्यातील ढोलना पोलीस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला. पोलिसांनी कुटुंबीयांना या संदर्भात माहिती दिली, तेव्हा त्यांनी तो मृतदेह युसूफचा असल्याची ओळख पटवली. हा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता आणि चेहरा ॲसिडने पूर्णपणे जळालेला होता.
पत्नीने केला गुन्हा कबूल
युसूफचा भाऊ आमिर याने पोलिसांना सांगितले की, त्याची वहिनी तबस्सुम हिचे तिच्या माहेरच्या शेअजरी राहत असलेल्या दानिश नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांमुळेच दोघांनी मिळून युसूफची हत्या केली असावी, असा संशय त्याने व्यक्त केला. आमिरच्या सांगण्यावरून पोलिसांनी तबस्सुम हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी पतीला संपवल्याचे तिने म्हटले.
छर्राचे सीओ धनंजय सिंह यांनी सांगितले की, मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पत्नीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.