लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षांच्या चिमुकल्याची मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासांत शहापूर परिसरातून सुखरूप सुटका करत चौघांना अटक केली. या अपहरण प्रकरणातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. महत्त्वाचे म्हणजे शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालकानेच हा अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. विरेन पाटील असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेकडील रिजेन्सी अनंतम गृहसंकुलात राहणारे बांधकाम व्यावसायिक महेश भोईर यांचा खासगी शाळेत शिकणारा मुलगा कैवल्य (वय ७) सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी नेहमीच्या रिक्षातून निघाला. सकाळी नऊच्या सुमारास रिक्षाचालक विरेन पाटील याच्या मोबाइलवरून महेश यांना व्हॉटसॲप कॉल आला. एका अनोळखी व्यक्तीने त्यावर संवाद साधत तुमच्या मुलाचे रिक्षाचालकासह अपहरण केले आहे, दोन कोटी रुपये द्यावे लागतील, पोलिसांना कळविल्यास दोघांना ठार मारण्याची धमकी दिली. महेश यांची पत्नी कोमल हिने मानपाडा पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसानी पथके नेमली.
पोलिसांचा संशय बळावला
महत्त्वाचे म्हणजे मुलाला शाळेत ने-आण विरेन आणि त्याचा भाऊ करायचा. सलग येणारा विरेनचा भाऊ शुक्रवारी आला नाही. विरेनच्या मोबाइलवरून व्हॉटसॲप कॉल करून खंडणी मागितली जात असल्याने पोलिसांचा विरेनवर संशय बळावला. विरेनच्या भावालाही चौकशीकामी आणले होते. दरम्यान, संबंधित मोबाइल ट्रेस करत पोलिसांची पथके शहापूर परिसरात पोहोचली आणि रिक्षाच्या नंबरवरून तिचा शोध घेत कैवल्यची साडेतीन तासांत सुटका केली. विरेन यानेच अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले.
आणखी आरोपी?
चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.