मुंबई - लाच घेतना वडाळा टी.टी. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे (५२) आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघमोडे (३७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहाथ पकडले. वादग्रस्त प्रकरणात मदत करण्यासाठी त्यांनी लाखो रुपये मागितले होते.
तक्रारदारांचे एका व्यक्तीसोबत त्यांच्या समाजाचा हॉल बांधण्यावरून वाद आहेत. ७ सप्टेंबर रोजी तक्रारदार व त्याच्या विरुद्ध गटामध्ये पुन्हा वाद झाल्याने दोन्ही गटांचे लोक वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात धडकले. त्यावेळी विरुद्ध गटाच्या तक्रारीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तक्रारदाराने मुलीला आरोपी न करण्यासाठी व विरुद्ध गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी वाघमोडेची भेट घेतली. तेव्हा, वाघमोडे याने स्वतःसाठी ५० हजार आणि सरोदेसाठी ५ लाखांची मागणी केली. १० सप्टेंबर रोजी वाघमोडे याने २० हजार रुपये स्वीकारले. २६ तारखेला ३० हजार रुपये स्वीकारले होते.