Santosh Kumar Singh Lawrence Bishnoi: मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री संतोष कुमार सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ३० लाख रुपये पाठवा अन्यथा, तुमचे बाबा सिद्दिकी यांच्यासारखे हाल करू, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धमकी देणाऱ्याने संतोष सिंह यांच्या गाडीचा नंबर, गावाबद्दलची माहितीही सांगितली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बिहारचे कामगार मंत्री संतोष सिंह यांना कॉल करून ही धमकी देण्यात आली आहे.
धमकी देणारा व्यक्ती म्हणाला की, 'जर जीव सुखात ठेवायचा असेल, तर ३० लाख रुपये पाठवा. विचार करून सांगा. पुन्हा मेसेज करणार नाही. तुमच्या पक्षाचे जितकेही लोक आहेत, त्यांना जे सांगायचं असेल, ते सांगा. नंतर सांगेन तुला."
संतोष कुमार सिंह म्हणाले पैसे का द्यायचे?
या घटनेबद्दल मंत्री संतोष कुमार सिंह म्हणाले, "आज दुपारी मला एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला होता. कॉल करणारा व्यक्ती म्हणाला की, मी लॉरेन्स बिष्णोई बोलतोय आणि त्याने ३० लाख रुपये मागितले. मी म्हणालो की, मी पैसे का द्यायचे. त्यानंतर मी कॉल बंद केला. त्याने पुन्हा कॉल केला. मी त्याचा कॉल घेतला नाही. त्याने तिसऱ्यांदा कॉल केल्यावर मी उचलला."
"कॉल घेताच त्याने धमकी दिली की, जर पैसे दिले नाही, तर तुझेही बाबा सिद्दिकीसारखे हाल करू. त्याने मला विचारलं की, मी कुठे आहे? मी त्याला सांगितलं की, मी आता नियोजन भवनात आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने मला मोबाईलवर स्कॅन कोड पाठवला आणि यावर पैसे पाठव असे सांगितले. तो मला गोळ्या घालण्याची धमकी देत होता. मी संपूर्ण घटनेची माहिती पोलीस महासंचालकांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत", अशी माहिती संतोष कुमार सिंह यांनी दिली.