दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक
By योगेश पांडे | Updated: March 21, 2024 20:16 IST2024-03-21T20:15:45+5:302024-03-21T20:16:28+5:30
विमलकुमार सिद्धु प्रसाद (२९) याला पोलिसांनी घेतले ताब्यात

दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: दुचाकीवरून एमडी पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून ७.२० लाखांची पावडर जप्त केली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. बुधवारी रात्री तहसील पोलीस ठाण्यातील पथक गस्तीवर असताना भानखेडा येथील दादरापुल रेल्वे लाईनजवळ एमएच ३१ एफवाय ०७२६ या दुचाकीवर एक व्यक्ती एमडी पावडरची विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तेथे पोहोचून विमलकुमार सिद्धु प्रसाद (२९, भांडेवाडी, पारडी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून ७२ ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्या पावडरची किंमत ७.२० लाख इतकी होती. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने तो माल शेख दानिश (नवीन नगर, पारडी) याचा असल्याचे सांगितले. शेखकडून तो माल घेऊन कमिशन बेसिसवर त्याची विक्री करायचा. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत प्रसादला अटक केली. तर शेखचा शोध सुरू आहे. प्रसाद हा मुळचा बिहारमधील पाटण्यातील परसा बाजार येथील मूळ रहिवासी आहे.