लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एक आठवड्यापूर्वी चरईतील भरत जैन यांचे रिव्हॉल्व्हरच्या धाकावर अपहरण करून नंतर दुकानातील चांदीच्या भांड्यांची लूट करणाऱ्या अतुल मिश्रा या सुरक्षारक्षकासह चौघांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून एक लाख २४ हजारांची दोन किलोची चांदीची भांडी जप्त केली. सुरक्षारक्षकाला ओळखल्यानंतर आपले बिंग फुटू नये, म्हणून त्याने जैन यांची हत्या केली, असे अंबुरे यांनी सांगितले.
मखमली तलाव, नीलकंठ सोसायटीत राहणाऱ्या जैन यांच्या अपहरणानंतर हत्या झाल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. दरम्यान, कळवा खाडीत जैन यांचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत मिळाला. सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांची दोन पथके तयार केली होती. सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर व अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला जैन यांचे दुकान तसेच परिसरातील १६ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. यातील एका दुचाकीजवळ घुटमळत असलेल्या घणसोलीतील सुभाष सुर्वे याला पथकाने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने साथीदार अतुल मिश्रा तसेच निलेश भोईर यांच्याशी संगनमत करून जैन यांच्याकडे टाकलेल्या दरोडा आणि खुनाची कबुली दिली.
अतुल याने कट रचून १४ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मखमली तलाव भागातून जैन यांना कारमध्ये कोंबून मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपहरण करून नेले. तिथेच अतुल याला जैन यांनी ओळखल्यामुळे रस्सीने गळा आवळून जैन यांचा खून केला. नंतर दुकानाची चावी घेऊन त्यांचा मृतदेह कळवा खाडीत फेकला. त्यानंतर आरोपींनी बी.के. ज्वेलर्स या दुकानात चोरी केली.