मुंबई : बॅटरी विक्रीच्या बहाण्याने भंगारवाल्याची ४१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना गोरेगाव पूर्व परिसरात शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गणेश मेहर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मनीष व्यास (४०) हा भंगार व्यावसायिक आहे. तो शनिवारी घरी असताना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आल. फोनवर बोलणाऱ्याने स्वत:चे नाव गणेश सांगून कंपनीतील जुन्या क्लायंटने नंबर दिल्याचे सांगितले. गोरेगाव पूर्वच्या रसेल इन्व्हेस्टमेंट कंपनीत सध्या ऑडिट सुरू असून, २९ जुन्या यूपीएस बॅटऱ्या विकायच्या आहेत. व्यास याने बॅटरी खरेदी करण्याची तयारी दर्शवत ४१ हजार २५० रुपयांत बॅटरी खरेदीचा व्यवहार झाला. गणेशने दिलेल्या नंबरवर अविनाश सिंग याचे नाव दिसत होते. मात्र, व्यास याने विश्वासाने त्या क्रमांकावर पैसे पाठवून दिले.
त्यानंतर गणेशने व्यासला बॅटऱ्या घेण्यासाठी दोन तासांत वेस्टीन हॉटेलच्या गेटजवळ यायला सांगितले. काही वेळात व्यास तेथे पोहोचला मात्र, बराच वेळ झाला तरी गणेश तेथे आला नाही. अखेर व्यासने गणेशला फोन केला. कंपनीचा गेट पास मिळत नसल्याने बॅटऱ्या रविवारी देतो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशीही कंपनी ऑडिटचा बहाणा करून बॅटऱ्या रात्री देत असल्याचे व्यासला सांगितले.
सुरक्षारक्षकाच्या नंबरचा वापरवारंवार पाठपुरावा केल्यानंतर गणेश उडवाउडवीची उत्तरे दिली. मी तुमचे पैसे घेतले नाहीत. ज्या क्रमांकावर पैसे पाठवले त्याच्याकडून पैसे मागा, असे सांगून गणेशने बॅटऱ्या देण्यास टाळले. त्यानुसार व्यासने त्या क्रमांकावर फोन केला असता तो नंबर नालासोपारामधील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाचा असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यासने पोलिसांत तक्रार केली.