aलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिक्कीम, नागालँडसारख्या राज्य सरकारांतर्फे जारी करण्यात येणाऱ्या लॉटरीच्या तिकिटांमध्ये घोटाळा करत, त्यातील बक्षिसाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फ्युचर गेमिंग ॲण्ड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत, त्यांची ४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
सिक्कीम, नागालँड आणि अन्य काही राज्य सरकारांद्वारे चालविण्यात येणाऱ्या लॉटरी योजनेसाठी फ्युचर गेमिंग कंपनीने संबंधित राज्य सरकारांशी करार केला होता, तसेच या राज्यांच्या लॉटरी तिकिटांची देशातील सर्व राज्यात विक्री करण्याचे कंत्राट मिळविले होते. मात्र, या कंपनीने अनेक तिकिटांची विक्रीच केली नाही व त्यातील बक्षीसपात्र तिकिटांवरील रक्कम स्वतःच्या खिशात घातल्याचे उजेडात आले. या प्रकरणात सर्वप्रथम कोलकात्यामध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र, या कंपनीने लॉटरी तिकिटांमध्ये केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती देशभरात असल्याने, या प्रकरणाचा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याच्या तपासादरम्यान कंपनीने ४०० पेक्षा जास्त कोटी रुपये जमा केल्याचे आढळले. ही रक्कम अवैधरीत्या कमावल्याचा ठपका ठेवत कंपनीच्या देशभरातील विविध बँक खात्यांतील ४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.