कैमूर - सासारामचे काँग्रेस खासदार मनोज कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. कैमूरच्या मोहनिया परिसरात ही घटना घडली. एका स्थानिक निवडणुकीच्या निकालानंतर मिरवणूक सुरू होती त्यावेळी बस ड्रायव्हरसोबत वाद झाला. यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या खासदारालाच जमावाने जखमी केले. या घटनेत खासदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत जखमी खासदारांना उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले आणि शाळेतील मुलांना सुरक्षित घरी पोहचवले.
खासदार मनोज कुमार यांचा भाऊ मृत्यूंजय भारती हे शाळेचे संचालक आहेत. निवडणुकीनंतर विजयी मिरवणूक सुरू होती. त्यावेळी स्कूल बसचे ड्रायव्हर आणि मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. त्यात खासदार मनोज कुमार जमावाला शांत करण्यासाठी पोहचले. त्यांनी काहींना शांत करून मिरवणूक पुढे करण्यास सांगितले. मात्र काही वेळाने ८-१० जणांचा ग्रुप लाठीकाठी घेऊन शाळेत पोहचला आणि पुन्हा झटापट सुरू झाली.
यात मनोज कुमार पुन्हा मध्यस्थी करायला गेले मात्र यावेळी काही जणांनी त्यांच्यावरच हल्ला सुरू केला. त्या हल्ल्यात खासदार मनोज कुमार यांना दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला मार लागला. पोलिसांनी वेळीच दखल घेत हा प्रकार रोखला आणि जखमी खासदारांना उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले. मिरवणुकीवेळी काही जणांनी बस चालकांसोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली असं मृत्यूंजय भारती यांनी सांगितले. खासदारांनी जेव्हा लोकांची समजूत काढून पाठवले, त्यानंतर आठ ते दहा जणांच्या जमावाने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात खासदाराचं डोकं फुटले.
दरम्यान, भरीगावातील लोकांचा शाळेवरून वाद चालला होता. त्या वादात मारहाणीचा प्रकार घडला. या मारहाणीत १२ हून अधिक लोक जखमी झाले. खासदारही त्यात जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून प्रकरणाची चौकशी सुरू केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून दोषींवर योग्य ती कारवाई करू अशी माहिती डीएसपी प्रदीप कुमार यांनी दिली.