बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपीचे वडील रुहुल अमीन म्हणाले की, मला मीडियाकडून त्याच्या अटकेची माहिती मिळाली.
आरोपी शरीफुलच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मी त्याचा फोटो टीव्हीवर पाहिला पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती माझा मुलगा नाही. पण ज्याला अटक करण्यात आली आहे तो माझा मुलगा आहे.
माझा मुलगा ३० वर्षांचा आहे पण मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आरोपीचा फोटोतील लूक आणि हेअरस्टाईल माझ्या मुलापेक्षा वेगळी आहे. बांगलादेशातील राजकीय गोंधळानंतर माझा मुलगा गेल्या वर्षी भारतात गेला. आम्हाला कसं जगायचं याची भीती वाटत होती, म्हणूनच माझा मुलगा पैसे कमवण्यासाठी भारतात गेला.
शरीफुलच्या वडिलांनी सांगितलं की, तो मुंबईत आहे हे मला माहीत नव्हतं. मी गेल्या शुक्रवारी संध्याकाळी त्याच्याशी शेवटचं बोललो होतो. तो दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत आम्हाला पैसे पाठवत असे. तो काय काम करतो हे मला माहीत नव्हतं, तो एका हॉटेलमध्ये काहीतरी काम करायचा. त्याने मला सांगितलं की त्याचा बॉस त्याच्या कामावर खूश होता आणि त्याने त्याला बक्षीसही दिलं.
बांगलादेशात आपल्या मुलाविरुद्ध दाखल झालेल्या हत्येच्या गुन्ह्याबाबत, त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. माझ्या मुलाचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. बांगलादेशमध्ये, कोणताही गुन्हा नसतानाही पोलीस लोकांवर गुन्हे नोंदवतात. येथील सर्व प्रकरणांमध्ये त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
रुहुल अमीन २००७ पर्यंत बांगलादेशातील खुलना येथील एका जूट मिलमध्ये काम करत होते. त्यानंतर ते त्यांच्या गावी परतले आणि शेती करू लागले. हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी असल्याचे पुरावेही सापडले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याचे बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले आहे. त्यात त्याचं नाव शरीफुल इस्लाम असं लिहिलं आहे.