राजस्थानच्या जोधपूरमधील साध्वी प्रेम बाईसा प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. भोमाराम हे तेच गृहस्थ आहेत, ज्यांनी साध्वी प्रेम बाईसा यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेवटची पोस्ट केली होती. या पोस्टनंतरच प्रकरणाने जोर धरला आणि मोठ्या संख्येने संत-महंत व भक्त एकत्र जमू लागले होते.'आजतक'ने भोमाराम यांच्याशी संवाद साधला.
भोमाराम यांनी सांगितलं की, २८ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी त्यांना वीरमनाथ यांचा फोन आला, ज्यामध्ये बाईसा यांची प्रकृती खराब असल्याचं सांगून तातडीने बोलावलं गेलं. ते संध्याकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी प्रेक्षा हॉस्पिटलमध्ये पोहोचले, परंतु तोपर्यंत साध्वी प्रेम बाईसा यांचं निधन झालं होतं. बाईसा हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तातडीने गुरुजींना फोन केला.
भोमाराम यांच्या म्हणण्यानुसार, रात्री सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांनी सर्वजण प्रेक्षा हॉस्पिटलमधून बाहेर पडले. वाटेत वीरमनाथ यांनी हनुमान बेनीवाल आणि कैलाश चौधरी यांना फोन केला. याशिवाय इतर २-३ संतांनाही घटनेची माहिती देण्यात आली. सर्वजण आरती नगरच्या वळणावर थांबले आणि त्यानंतर आरती नगर आश्रमात पोहोचले. वीरमनाथ यांच्या सांगण्यावरून त्यांनी साध्वी प्रेम बाईसा यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी न्यायाची मागणी करणारी पोस्ट टाकली. या पोस्टनंतर भक्तांचं येणं सुरू झाले आणि हळूहळू गर्दी वाढत गेली.
वीरमनाथ यांनी सांगितलं की, संत-महात्मा आल्यानंतर शवविच्छेदन केलं जाईल. दरम्यान, २-३ तरुणांनी गोंधळ घातला आणि न्यायाच्या घोषणा दिल्या, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. वीरमनाथ यांनी सांगितल्यानुसारच पोस्ट करण्यात आली होती. पोस्टमध्ये म्हटलं होतं की, बाईसा २५ वर्षे ब्रह्मचर्याचे जीवन जगल्या, परंतु लोकांनी त्यांना कलंकित केलं. भोमाराम यांच्या मते, वीरमनाथ यांनी सांगितले होतं की, याच कारणामुळे बाईसा यांनी शंकराचार्यांना पत्रही लिहिलं होतं.
भोमाराम यांनी सांगितलं की, ते जन्मापासूनच साध्वी प्रेम बाईसा यांच्याशी जोडलेले होते आणि त्यांच्या अत्यंत जवळचे होते.साध्वी प्रेम बाईसा यांना सर्दी-खोकला झाल्यावर श्वास घेण्यास त्रास व्हायचा, तेव्हा त्या वाफ घ्यायच्या. त्यांनी भावूक होत सांगितलं की, आता बाईसा या जगात नाहीत, पण त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते आजही न्यायाच्या मागणीवर ठाम आहेत आणि त्यांनी जे काही केलं ते वीरमनाथ यांच्या सांगण्यावरून आणि बाईसा यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलं.
Web Summary : The person who posted on Sadhvi Prem Baisa's Instagram account before her death revealed that he posted the message seeking justice at the behest of Viramnath, after being informed of her death and instructed to do so.
Web Summary : साध्वी प्रेम बाईसा की मौत से पहले उनके इंस्टाग्राम अकाउंट पर पोस्ट करने वाले व्यक्ति ने खुलासा किया कि उसने वीरमनाथ के कहने पर न्याय मांगने वाला संदेश पोस्ट किया था, उसे उसकी मौत की सूचना दी गई और ऐसा करने का निर्देश दिया गया था।