एकीकडे नात्यांना काळीमा फासणाऱ्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतानाच मध्यप्रदेशातून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रीवा जिल्ह्यात एका पतीने केवळ मोबाईल वापरण्यावरून झालेल्या वादानंतर आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर चोरीचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. रीवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपी पतीला अटक केली आहे.
रात्री मोबाईल पाहण्यावरून वाद आणि हत्या२८ जून रोजी रात्री मनगंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सथिनी गावात ही घटना घडली. सकाळी त्याच घरात महिलेचा मृतदेह आढळला, तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
सुरुवातीला पतीने पोलिसांना सांगितले की, "रात्री काही चोर घरात घुसले होते. त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आणि चोरांनीच माझ्या पत्नीची हत्या केली."
पोलिसांना संशय आला आणि सत्य समोर आले!मात्र, पतीचे हे विधान पोलिसांना संशयास्पद वाटले. पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचे म्हणणे आणि घटनास्थळावरील पुरावे जुळत नव्हते. चोरीचा बनाव रचल्याचे आणि घरातील वस्तू जाणूनबुजून विस्कटून ठेवल्याचे पोलिसांना सुरुवातीपासूनच जाणवले.
पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला. आरती सिंह यांनी सांगितले की, २७ जूनच्या रात्री जेवण करून पती-पत्नी आपल्या खोलीत झोपायला गेले होते.
पत्नीच्या हत्येनंतर रुग्णालयात दाखल झाला पतीआरती सिंह यांनी पुढे सांगितले की, रात्र झाल्यामुळे पत्नीने पतीला मोबाईल बंद करून झोपायला सांगितले. यामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीचे तोंड पांघरूणाने दाबले आणि तिची हत्या केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने घरातील कपाटात ठेवलेले दागिने, कपडे आणि भांडी विस्कटून टाकली. त्यानंतर त्याने आपल्या मित्राला बोलावले. एवढेच नाही, तर पायात सर्पदंशासारखी खोटी जखम करून, तो उपचारासाठी रुग्णालयातही गेला.
बनाव रचण्याचा प्रयत्नआरोपी पतीने अशा प्रकारे घरात बनावट परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून असे वाटेल की चोरट्यांनी त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. मात्र, पोलिसांच्या चौकशीत त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. "माझ्या पत्नीने मला मोबाईल वापरू दिला नाही, म्हणून मी तिचे तोंड पांघरूणाने दाबून हत्या केली," असे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.