पिंपरी : चाकण येथील एका नामांकित कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर एका तरुणाने अत्याचार केला. तसेच तरुणीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देत तरुणीला मारहाण केली. ही घटना ६ जून ते २१ आॅगस्ट २०१९ या कालावधीत चिंचवड येथे घडली. याबाबत पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार कासार (वय २१, रा. वाळकी, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार याने फिर्यादी तरुणीला चाकण येथील नामांकित कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तिच्याशी जवळीक साधून तिला लग्नासाठी मागणी घातली. तरुणी बसने प्रवास करत असताना तिचा पाठलाग केला. इंटर्नशिप संदर्भात बोलायचे असल्याचे सांगून तिला रिक्षातून थरमॅक्स चौकातील लॉजवर नेले. तिथे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणीने विरोध केला असता तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
कंपनीत इंटर्नशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 16:25 IST