महेश देसाईसांगली : अक्षय कुमारच्या ‘स्पेशल-२६’ चित्रपटाच्या कथानकाचे अनुकरण करीत कवठेमहांकाळ येथील डॉक्टरांच्या घरात छापा टाकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या फिल्मी स्टाईल चोरीच्या घटनेने पोलिस चक्रावून गेले आहेत.जिल्ह्यात प्रथमच बोगस छाप्याचे इतके मोठे प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी बोगस पोलिसांकडून लुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, बोगस आयकर अधिकारी असल्याचे सांगत छापा टाकल्याचे प्रकरण समोर आल्याने साऱ्यांना धक्का बसला आहे.बनाव करून घरात शिरलेटोळीतील महिलेने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला डॉ. म्हेत्रे हे आमचे पाहुणे आहेत आणि एक रुग्ण चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यांना लवकर बोलवा म्हणत त्या कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ जाऊन दरवाजा उघडताच चौघे जण घरात घुसले. आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बनावट ओळखपत्रे दाखवत त्यांनी छाप्याचा बनाव केला. ‘आपण आम्हाला सहकार्य करा’ असे सांगत चोरट्यांनी डॉक्टरांकडे असलेली सर्व रक्कम व सोने जमा करायला सांगितले. हा ऐवज सोमवारी कोर्टातून घेऊन जाण्याची सूचना देत त्यांनी पलायन केले.
वकिलांशी चर्चा केल्यानंतर बनाव उजेडातडॉ. म्हेत्रे यांच्या मुलाने आयकरचे काम पाहणाऱ्या त्यांच्या परिचयातील वकिलांना या घटनेची माहिती दिली. वकिलांनी हा छापा बोगस असल्याचा संशय व्यक्त केला. म्हेत्रे कुटुंबीयांनाही फसवणुकीचा संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसप्रमुखांनी घेतली दखलकवठेमहांकाळ शहरात ही घटना घडताच जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप गुगे, जत उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन थोरबोले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व कवठेमहांकाळ पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली.
पाच पथके रवानाघटनेच्या शोधप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणची तीन पथके व कवठेमहांकाळ पोलिसांची दोन पथके अशी एकूण पाच पथके तपासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती जत उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन थोरबोले यांनी सांगितले.
बोगस छाप्यातून लंपास केलेला ऐवज
- शंभर ग्रॅम वजनाची ९ सोन्याची बिस्किटे : ५४ लाख
- २१० ग्रॅम वजनाच्या १० सोन्याच्या बांगड्या : १२.६० लाख
- नव्वद ग्रॅमचे ३ सोन्याचे नेकलेस : ५.४० लाख
- पाच ग्रॅम वजनाची ६ मंगळसूत्रे : १.८० लाख
- पाच ग्रॅमच्या १० सोन्याच्या अंगठ्या : ३ लाख
- पंधरा ग्रॅमच्या ५ सोन्याच्या चेन : ४.५० लाख
- एक ग्रॅमची पाच सोन्याची नाणी : ३० हजार
- पाच ग्रॅमची ८ ब्रेसलेट : २.४० लाख
- सोन्याच्या रिंग : ६० हजार
- रोख रक्कम १५.६० लाख