push up by person to the sub-inspector of Bhosari police station | भोसरीत पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की
भोसरीत पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की

पिंपरी : महिलेची तक्रार का घेतली नाही, असे म्हणत पोलिसाच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी दमदाटी केली. भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २०) हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कांबळे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. हंडाळ यांनी फिर्याद दिली आहे. माधुरी गजानन धोटे (रा. आळंदीरोड, भोसरी) तक्रार देण्यासाठी शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह आरोपी संजय कांबळे पोलीस ठाण्यात आला. माधुरी धोटे सकाळी दहापासून तक्रार देण्यास आली आहे, या महिलेची तक्रार का घेतली नाही, असे तो म्हणाला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक हंडाळे समजावून सांगत असताना आरोपी कांबळे याने अंगावर धावून येऊन, शिवीगाळ करून त्यांची कॉलर पकडून तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी दमदाटी करून हंडाळे यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


Web Title: push up by person to the sub-inspector of Bhosari police station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.