पुणे: विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर नराधमाने अमानुष बलात्कार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे टांगली गेल्याने पुणेच नाही तर राज्य हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
अवध्या १०० फुटांवर पोलिस चौकी, १८ सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांचा फौजफाटा असा सुरक्षेचा सरंजाम असतना, दत्तात्रय रामदास गाडे (३६, शिक्रापूर) या गुन्हेगाराने पीडितेवर दोनवेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
गाडे हा सराईत गुन्हेगार असून, पूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. आता त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यात नोकरी करणारी तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. बसची वाट पाहत असताना गाडेने तिला हेरले. त्याने फलटणला जाणारी बस इथे लागत नाही, पलिकडे लागते असे तिला सांगितले. पीडितेने मी नेहमीच जाते, इथे बस लागते असे सांगत त्याला नकार दिला. यावर त्याने तिचा विश्वास संपादन करत तिला शिवशाही बसजवळ नेले. व ही बस जात असल्याचे सांगत तिला त्यात बसण्यास सांगितले. बसमध्ये अंधार असल्याचे तिने म्हणताच त्याने हवे तर तू मोबाईलची लाईट लाव आणि आत पाहून ये, लोक झोपली आहेत, असे सांगितले. यावर ती आतमध्ये जात असताना त्याने तिला मागून पकडले व गळा आवळला. तसेच मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
मित्राला फोनवर सांगितली आपबितीया घटनेने तरुणीला धक्का बसला होता. तिने बसमधून खाली उतरल्यावर एका प्रवाशाला गाडेने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर, ती फलटणच्या बसमध्ये बसून निघून गेली.प्रवासात अस्वस्थ वाटत असतानाच तिने मित्राला फोन करून तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती दिली. मित्राने धीर दिल्यावर माघारी फिरून स्वारगेटला आली. सकाळी नऊच्या सुमारास तिने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
म्हणे, मी तर पोलिस...नराधम दत्तात्रय गाडे याचा नेहमी स्वारगेट स्थानकात वावर असायचा. इनशर्ट, शूज, मास्क असा त्याचा पेहराव असायचा. पोलिस असल्याचे तो भासवायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२३ सुरक्षारक्षक निलंबितस्वारगेटमधील २३ सुरक्षारक्षकांना निलंबित केले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
कठोर कारवाईचे निर्देशराज्य सरकारने या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आरोपीला अटक होऊन कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना असून, आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. आरोपीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.