कोयत्याने वार करून पुजाऱ्याचा खून; हिंगोली जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:18 PM2018-07-04T12:18:15+5:302018-07-04T12:19:57+5:30

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

The priest's murder in Hingoli district | कोयत्याने वार करून पुजाऱ्याचा खून; हिंगोली जिल्ह्यातील घटना

कोयत्याने वार करून पुजाऱ्याचा खून; हिंगोली जिल्ह्यातील घटना

Next

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. देवीदास ऊर्फ बंडू श्रीराम सौदागर (४0) असे मृताचे नाव आहे. यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आजेगाव येथे गावापासून दीड कि.मी. अंतरावर मुख्य रस्त्यावरच नागझरी महादेव मंदिर आहे. या ठिकाणी मागील आठ ते दहा वर्षांपासून मूळचे वाशिम तालुक्यातील काटा येथील देवीदास ऊर्फ बंडू श्रीराम सौदागर हे पुजाऱ्याचे काम पाहायचे. गावातच असलेल्या मामांकडे त्यांचे वास्तव्य होते. मंगळवारी पूजा करण्यास उशिर झाल्याने ते गावातील राम नारायण बनभैरू व मारोती रामाकृष्ण राऊत यांच्यासमवेत मंदिराकडे गेले होते.

मुख्य मंदिरात बंडू महाराज तर इतर दोन मंदिरांमध्ये बनभैरी व राऊत हे दिवाबत्ती करीत होते. अचानक बंडू महाराजांच्या ओरडण्याचा आवाज आला. तेथे कोणीतरी रेनकोट व टोपी घातलेली व्यक्ती तोंड रुमालाने झाकून महाराजांवर कोयत्याने एकापाठोपाठ एक असे सपासप वार करीत होता. अतिशय क्रूरपणे त्याने हे वार केले. हे दोघे मदतीला जाणार तोच त्याने धमकावले. पुन्हा काही वार करून तो पळून गेला.

या दोघांनी गावातील लोकांशी संपर्क साधून महाराजांना आधी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता बंडू महाराज रस्त्यातच मृत्यू पावल्याचे सांगितले. घटनास्थळी पोनि माधव कोरंटलू, कर्मचारी के.एम. थिटे आदींनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गोरेगाव पोलीस कारणाचा शोध घेत होते.  गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शवविच्छेदनानंतरच केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The priest's murder in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.