Kerala Crime: केरळमधल्या आणखी एका विवाहितीतेने टोकाचं पाऊल उचललं आहे. मध्य केरळमधील इरिंजलाकुडा जिल्ह्यात एका २३ वर्षीय गर्भवती महिलेचा मृतदेह तिच्या घराच्या छताला लटकलेला आढळला. मृत महिलेचे नाव फसीला असून ती येथील कोट्टापरंबिलची रहिवासी होती. पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती नौफल आणि सासू रामला यांना अटक केली आहे आणि दोघांनाही बुधवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
२९ जुलै रोजी फसीलाचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. फसीलाच्या आई वडिलांनी तक्रार केल्यानंतर पती आणि सासूला अटक करण्यात आली. सततच्या घरगुती हिंसाचाराला कंटाळून फसीलाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये काही वाद होता. महिलेने हे पाऊल उचलण्यामागे हे देखील कारण असू शकतं. या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. तिचा पती नौफलला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. मंगळवारी सकाळी ६.५० ते ८.०० च्या दरम्यान घराच्या टेरेसवर ही घटना घडली.
कार्डबोर्ड बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या नौफल आणि फसीला यांचे लग्न दीड वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना एक मूल आहे. मृत्यूच्या वेळी, फसीला गर्भवती होती. आत्महत्या करण्यापूर्वी फसिलाने तिच्या आईला पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती दिली होती. फसीलाने तिच्या पती आणि सासूकडून वारंवार होणाऱ्या अत्याचारांचे वर्णन केले होते. फसिलाने मेसेजमध्ये सांगितले की ती गर्भवती आहे आणि नौफलने तिच्या पोटात लाथ मारली आणि तिचे हात तोडले. तिने सासूवर सतत अत्याचार करण्याचा आरोपही केला. 'मी मरुन जाते, नाहीतर ते मला मारुन टाकतील,' असं तिने शेवटच्या मेसेजमध्ये लिहीलं होतं.
फसीलाने तिच्या कुटुंबाकडे वारंवार तिच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराची तक्रार करायची. पण तिच्या आई वडिलांनी तिला प्रत्येक घरात या गोष्टी सामान्य आहेत, असं सांगून संसार करायला सांगितले होते. जेव्हा नौफलला ती गर्भवती असल्याचे कळले तेव्हा अत्याचार आणखी वाढला. फसिलाच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूच्या फक्त एक दिवस आधी ती गर्भवती असल्याचे सांगण्यात आलं होतं.
फसिलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर,पोलिसांनी नौफल आणि रामला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. दोन्ही आरोपी फसीलाला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते आणि नौफलने गर्भवती पत्नीच्या पोटात लाथ मारल्याने तिला मानसिक त्रास झाला, ज्यामुळे शेवटी तिने आत्महत्या केली, असं एफआयआरमध्ये म्हटले आहे.