लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील कवी आलोक पराडकर यांची पत्नी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली. कवी आलोक पराडकर यांनी पत्नी रिना पराडकर यांना शोधण्याचं आवाहन केले. त्यानंतर लखनौ पोलिसांनी काही तासांतच रिना पराडकर यांचा शोध लावला. बेपत्ता झालेली महिला पोलिसांच्या ताब्यात असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कवी आलोक पराडकर यांनी शनिवारी रात्री पत्नी रिना पराडकर बेपत्ता झाल्याची पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर टाकली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माहितीनुसार, ही महिला टूंडला जंक्शन येथे सापडली. डीसीपी शशांक सिंह यांच्या नेतृत्वात महिलेच्या शोधासाठी पथक नेमण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे २४ तासाच्या आत या महिलेला सुखरुप ताब्यात घेण्यात आले. कवी आलोक पराडकर यांनी सांगितले होते की, पत्नी रिना पराडकर शनिवारी मुलीला आयएएस कोचिंग सेंटरला सोडण्यासाठी दुपारी १ वाजता घरातून निघाली होती. कारमधून ती घरी परतत होती परंतु तिचा मोबाईल बंद लागला. त्यानंतर सातत्याने संपर्क लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो झाला नाही. पत्नी घरी परतली नसल्याने तिचं अपहरण झाल्याची भीती व्यक्त करत आलोक पराडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
आलोक पराडकर यांच्या पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. त्यानंतर टूंडला जंक्शन येथून रिना पराडकर यांना ताब्यात घेण्यात आले. रिना यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष टीम कार्यरत होती. रिना पराडकर या एका मित्रासोबत ट्रेनने कुठेतरी जाण्याच्या तयारीत होत्या. त्यांची कार गाजीपूरच्या लक्ष्मीपूर येथे पोलिसांना सापडली. तपासावेळी चारबाग रेल्वे स्टेशनजवळील सीसीटीव्हीत रिना पराडकर यांना जाताना पाहण्यात आले.
दरम्यान, दुपारी १ वाजल्यापासून पत्नी रिनाचा फोन बंद येत होता. मी काही कामानिमित्त अहमदाबादला गेलो होतो. तेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मी मदत मागितली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी क्राइम ब्रांचकडे हे प्रकरण सोपवले असं आलोक पराडकर यांनी सांगितले. तपास पथकाने रिना पराडकर यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी रिना यांची कार लेखराज चौकाजवळ अखेरीस नजर आली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अयोध्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर रिना पराडकर यांचा शोध लागला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.