गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी पाली पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:39 IST2018-10-07T05:38:50+5:302018-10-07T05:39:24+5:30
गेल्या एक वर्षापासून गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पाली पोलीस ठाण्याच्या आरोपी शोध पथकाने ३० सप्टेंबर २०१८ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील जंगलभागात मोठ्या शिताफीने अटक करून पाली पोलीस ठाण्यात आणले.

गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी पाली पोलिसांच्या ताब्यात
पाली : गेल्या एक वर्षापासून गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पाली पोलीस ठाण्याच्या आरोपी शोध पथकाने ३० सप्टेंबर २०१८ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील जंगलभागात मोठ्या शिताफीने अटक करून पाली पोलीस ठाण्यात आणले.
पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील आंबवणे आदिवासीवाडी येथील राहणारा आरोपी राजा उर्फ राजू काळू पवार याच्यावर १० आॅगस्ट २०१७ रोजी पाली पोलीस ठाण्यात चोरी-दरोड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून राजा उर्फ राजू पवार हा फरार झाला होता.
त्याला शोधण्यासाठी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नारायण चव्हाण यांचे शोधपथक पुणे जिल्ह्याला रवाना झाले. ते आरोपी पवार हा राहत असलेल्या मुळशी तालुक्यातील आंबवणे आदिवासीवाडी येथे पोहोचले. तेथील पोलीस पाटील यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता, तो आरोपी तेथील जंगलात राहत असल्याची माहिती मिळाली.
पोलीस उप निरीक्षक चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी ३० सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे तेथील जंगलात आरोपीचा शोध घेण्यास सुरु वात केली असता, सकाळी ८ च्या सुमारास तो आरोपी एका महिलेसह एका ठिकाणी दिसला असता, मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला पाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपी राजा उर्फ राजू काळू पवार बेड्या ठोकल्याने पाली पोलिसांचे कौतुक होत आहे.