रिक्षा चोरांना पाठलाग करून पकडले; २ जेरबंद, रामनगर पोलिसांची कामगिरी
By प्रशांत माने | Updated: October 12, 2022 15:29 IST2022-10-12T15:29:30+5:302022-10-12T15:29:48+5:30
पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्हयातील ती रिक्षा असल्याचे स्पष्ट झाले.

रिक्षा चोरांना पाठलाग करून पकडले; २ जेरबंद, रामनगर पोलिसांची कामगिरी
डोंबिवली: शहरात दुचाकींसह पार्किग असलेल्या रिक्षा चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना चोरीची रिक्षा घेऊन जात असलेल्या दोघा चोरटयांना रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
शहरातील वाहनांच्या वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रामनगर, विष्णुनगर, मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश सानप हे पोलीस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, शंकर निवळे, नितीन सांगळे, वैजनाथ रावखंडे यांच्यासह हद्दीत दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी पुर्वेकडील मानव कल्याण केंद्राच्या मागील टाटा लेन परिसरात दोघेजण रिक्षा घेऊन संशयस्पादरित्या जाताना दिसून आले. पोलीसांनी रिक्षाचा पाठलाग केला आणि दोघांना ताब्यात घेतले. रिक्षाच्या कागदपत्रांची त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्हयातील ती रिक्षा असल्याचे स्पष्ट झाले. तेजस नायर (वय २२) आणि मयूर केणे (वय २३ ) दोघेही रा. आजदे गाव अशी अटक आरोपींची नावे असून दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरिक्षक सानप यांनी दिली. त्यांच्यावर मारामारीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.