Indian Railway: गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांना मारहाण होण्याच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. खाण्यासाठी किंवा रेल्वेत देण्यात येणाऱ्या पाण्याच्या बाटलीसाठी अधिकचे पैसे मागण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. मात्र याच्या तक्रारी करुनही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र तक्रार करणाऱ्याला प्रवाशालाच मार खावा लागतो. त्यानंतर प्रशासन कारवाई करतं. असाच प्रकार सोमनाथ एक्स्प्रेसमधून समोर आला आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र कधीकधी आरामदायी प्रवासाऐवजी प्रवाशांना मनस्तात सहन करावा लागतो. लोक अनेकदा सोशल मीडियावर ट्रेनमधील त्रुटींबद्दल तक्रारही करतात.पण सोमनाथ एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला जेवणाची तक्रार करणे महागात पडलं आहे. तक्रार केल्यानंतर रेल्वेतील पेंट्री कर्मचाऱ्यांनी एका प्रवाशाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वेरावळ-जबलपूर सोमनाथ एक्सप्रेसमध्ये हा सगळा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये स्लीपर कोचमधील काही पेंट्री कर्मचारी एका प्रवाशाला मारहाण करत असल्याचे दिसून येते. या प्रवाशाने अन्न आणि पाण्यासाठी जास्त पैसे आकारल्याची तक्रार केली होती. तक्रारीनंतर, पेंट्री कर्मचाऱ्यांनी त्याच्या सीटवर येऊन त्याच्यावर हल्ला केला. दोन ते तीन कर्मचारी त्या एका प्रवाशाला बेदम मारहाण करत होते. प्रवाशाने एक्स पोस्टवरुन तक्रार केल्यानंतर रेल्वेतील कर्मचारी आले आणि त्यांनी मारहाण सुरु केली.
यापूर्वी तक्रारीनंतर पेंट्री कर्मचाऱ्यांकडून मारहाणीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तक्रारी कराव्यात की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयआरसीटीसी वारंवार अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि कारवाई करण्याचा दावा करते,मात्र परिस्थिती तशीच आहे.
या घटनेनंतरही रेल्वेने सांगितले की, संबंधित लोकांना कळविण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच उपलब्ध आहोत. तुम्ही तुमचा पीएनआर नंबर आणि मोबाईल नंबर मेसेज करू शकता. जबलपूरच्या डीआरएमनेही या घटनेबद्दल माफी मागितली आहे. आयआरसीटीसीशी संबंधित पेंट्रीचा करार रद्द करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.