बंगळुरूमध्ये अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर त्याचे कुटुंबीय आता आपल्या नातवाच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहेत. अतुलच्या आईने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात आपल्या ४ वर्षांच्या नातवाचा ताबा देण्यासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणावर ७ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
३४ वर्षीय अतुलने ९ डिसेंबर रोजी बंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने सुमारे दीड तासाचा व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. २४ पानांची सुसाईड नोटही त्याने मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवली होती. यानंतर बंगळुरू पोलिसांनी आरोपींना अटक केली. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
अतुल सुभाषची आई अंजू मोदी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, न्यायालयाने माझ्या नातवाचा ताबा द्यावा. त्याला कुठे ठेवण्यात आलं आहे हे आम्हाला माहीत नाही. निकिता सिंघानिया किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मुलाचा ठावठिकाणा सांगितलेला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. निकिता सिंघानियाने पोलिसांना सांगितलं की, तिने फरीदाबादमधील बोर्डिंग स्कूलमध्ये मुलाचं एडमिशन केलं आहे.
नवा ट्विस्ट! "३ गर्लफ्रेंडवर खर्च करायचा सर्व पगार..."; निकिताचा अतुलबाबत मोठा खुलासा
निकिता सिंघानियाने अतुल सुभाषबाबत जी माहिती दिली त्यावरून या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. निकिताचा खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांच्या चौकशीदरम्यान निकिताने अतुल सुभाषवर फसवणूक केल्याचा आणि त्याच्या तीन गर्लफ्रेंड असल्याचा आरोपही केला. तिने पोलिसांना सांगितलं की, "मला आणि माझ्या कुटुंबीयांना या प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे, आम्ही अतुलकडे पैसेही मागितले नाहीत किंवा आम्ही कधीही कोणतीही मागणी केली नाही, उलट अतुल आणि त्याच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे १० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता."