राजन मंगरुळकर, परभणी: जीएनएम कोर्स प्रवेशाकरिता इतर खर्चाच्या नावाखाली तिरुपती नर्सिंग स्कूलच्या अध्यक्षाने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईमध्ये ही लाचेची रक्कम अध्यक्षाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारली. ही कारवाई परभणी शहरातील तिरुपती नर्सिंग स्कूल येथे करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संभाजी मुंजाजी टोम्पे, तिरुपती नर्सिंग स्कूल अध्यक्ष आणि शेख माजेद शेख युनूस, खासगी इसम अशी लाच प्रकरणातील आरोपी लोकसेवकाची नावे आहेत. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त तिरुपती नर्सिंग स्कूल येथे जीएनएम कोर्स प्रवेशाकरिता अध्यक्ष टोम्पे यांनी इतर खर्चाच्या नावाखाली २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. अध्यक्ष टोम्पे यांना तक्रारदार यांनी तो कॅटेगिरीमध्ये असून त्यास शुल्क लागत नसल्याचे सांगितले. तरी सुद्धा टोम्पे यांनी इतर खर्चाच्या नावाखाली ही लाच मागणी केली. याबाबत सोमवारी तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी कार्यवाही करण्यात आली. तेव्हा प्राचार्य टोम्पे यांनी २० हजार रुपये फीस ही विविध ठिकाणी असणाऱ्या ट्रेनिंग आणि बेड व्यवस्थासाठी दीडशे रुपये लागतात, इतर काही खर्च सुद्धा लागतो, त्यामुळे कागदपत्रे आणि वीस हजार शुल्क भरा म्हणून इतर खर्चाच्या नावाखाली पंचासमक्ष लाच मागणी केली होती.
मंगळवारी तिरुपती नर्सिंग स्कूल येथे केलेल्या सापळा कारवाईमध्ये अध्यक्ष टोम्पे यांनी तक्रारदार यांना २० हजार रुपयाची रक्कम शेख माजेद शेख यूनूस याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने शेख माजेद यास पंचासमक्ष २० हजार रुपये लाच रक्कम दिली असता शेख माजेद याने ही लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर शेख माजेद याने लाचेची रक्कम अध्यक्ष टोम्पे यांच्याकडे दिली.
अंगझडती आणि घरझडती सुरू
संभाजी टोम्पे यांची अंगझडती घेतली असता हातात सोनेरी घड्याळ, सोन्याची अंगठी, दोनशे रुपयांच्या वीस नोटा, १०० रुपयाच्या तीन नोटा, २० रुपयाची एक नोट व पाचशे रुपयांच्या सहा नोटा मिळून आल्या. शेख माजेद याच्याकडे दोनशे रुपयाची एक आणि पाच रुपये मिळून आले. दोन्हीही आरोपीची घरझडती सुरू आहे.
गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू
आरोपी लोकसेवकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपी लोकसेवकाचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार, भूमकर, आदमे, सीमा चाटे, अतुल कदम, शेख जिब्राईल, मदन शिंपले, श्याम बोधनकर, नरवाडे, लहाडे यांनी केली.