An online mess of six lakh pretending to be in the military | लष्करात असल्याचे भासवून सहा लाखांचा आॅनलाइन गंडा

लष्करात असल्याचे भासवून सहा लाखांचा आॅनलाइन गंडा

मुंबई : ओएलएक्सवरून स्कॉर्पिओ विक्रीची जाहिरात देऊन एकाला ६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या परप्रांतीय तरुणाला माटुंगा पोलिसांनी शनिवारी अटक केली. आसिफ खान (पहाडी, ता. भरतपूर) असे त्याचे नाव आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलात (सीआयएसएफ) असल्याचे सांगून तो फसवणूक करीत होता, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ निरीक्षक विजय सिंह घाटगे यांनी वर्तविली.


आसिफ खानने ओएलएक्स आॅनलाइन शॉपिंग साइटवर महिंद्रा स्कॉर्पिओ विकण्याची जाहिरात दिली होती. माटुंगा परिसरात राहत असलेल्या एका व्यक्तीने त्यावरून त्याच्याशी संपर्क साधला असता, त्याने सीआयएसएफमधून बोलत असल्याचे भासवून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर लष्कराच्या वेशातील विविध फोटो व बनावट ओळखपत्र पाठवून विश्वास मिळविला. ६ लाखांना स्कॉर्पिओ देण्याचे आमिष दाखविले. बिझनेस इन्स्टॉल अ‍ॅपवरील अकाउंटवर रक्कम भरण्यास सांगितले. रक्कम भरल्यानंतर तो फोन घेणे टाळू लागला.


अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर कक्षातील निरीक्षक राहुल गौड, उपनिरीक्षक राजा गरड कॉन्स्टेबल संतोष पवार, राहुल मोरे यांच्या पथकाने मोबाइल लोकेशनवरून खानचा शोध लावला. त्या वेळी तो राजस्थानमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार, राजस्थानला जाऊन त्याला अटक करण्यात आली.

Web Title: An online mess of six lakh pretending to be in the military

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.